Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनसुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

दिल्ली | Delhi

जेष्ठ अभिनेते व सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची घोषणा आज केली.

प्रकाश जावडेकर यांनी म्हंटलं आहे की, ‘देशातील सर्व भागातील चित्रपट निर्माते, अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आज महान नायक रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करून आम्हाला आनंद झाला आहे.’ दादासाहेब फाळके पुरस्काराचे हे यंदाचे ५१ वे वर्ष आहे. पुरस्काराचे वितरण ३ मे रोजी होणार असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली आहे.

रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. १२ डिसेंबर १९५० रोजी बेंगळुरुतील एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांचा प्रवास अद्भूत आहे. रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीतील सर्वात पहिला ब्रेक १९७५ मध्ये वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी मिळाला. हा चित्रपट होता ‘अपूर्व रागंगल’. कमल हसन यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात रजनीकांत यांना केवळ १५ मिनीटांची भूमिका मिळाली होती. शाळेपासूनच रजनीकांत यांना अभिनयाची आवड होती. शाळेतील अनेक नाटकांमधून त्यांनी खलनायकाची भूमिका केली. रावणाची व्यक्तिरेखा साकारायला त्यांना फार आवडायचे.

चित्रपटसृष्टीत येण्याआधी रजनीकांत ‘बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’मध्ये ‘कंडक्टर’ म्हणून कामाला होते. आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी रजनीकांत त्यांच्या घराजवळ असलेल्या रामा हनुमान मंदिरात स्टंट्सची प्रॅक्टिस करत असत. रजनीकांत असे एकमेव अभिनेते आहेत ज्यांचा CBSE अभ्यासक्रमात उल्लेख केला गेला. भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांच्याइतकी लोकप्रियता कुणालाच मिळवता आली नाही. आजही रजनीकांत यांचा चित्रपट प्रदर्शित झाला की, चाहते पहाटे पासून चित्रपटगृहांबाहेर रांगा लावतात. रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या स्वागतासाठी वाजत गाजत मिरवणुका निघतात.

काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी सक्रिय राजकारणात येण्याची घोषणा केली होती. नव्या वर्षाच्या मुहूर्तावर ते आपल्या राजकीय पक्षाची घोषणाही करणार होते. मात्र अचानक रजनीकांत यांची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ रूग्णालयात हलवण्यात आले. बरे होऊन घरी परतल्यावर, रजनीकांत यांनी प्रकृतीचे कारण देत सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहिर केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या