Friday, April 26, 2024
Homeनगरसुपा : अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले

सुपा : अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले

सुपा (वार्ताहर) –

सुपा (ता. पारनेर) येथे सुपा चौक ते पारनेर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणाविरोधात पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने

- Advertisement -

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले. नववर्षाच्या मुहूर्तावर सुपा पोलिसांनी ही धडक कारवाई सुरू केल्याने ग्रामस्थांमधून स्वागत केले जात आहे. या अतिक्रमाणाबाबत वेळोवेळी दै. ‘सार्वमत’ने आवाज उठवला होता. शुक्रवारी याबाबत पुन्हा वृत्त प्रसिध्द करताच पोलिसांनी जोरदार कारवाई केली.

शुक्रवारी (दि. 1) सकाळी 10 वाजता उपनिरीक्षक कोसे यांच्यासह सुमारे 20 कर्मचार्‍यांचा ताफा सुपा येथील चौकात आला. पोलिसांची एवढी कुमक कशासाठी आली असेल, अशी चर्चा सुरू असतानाच पोलिसांनी रस्त्याच्याकडेला दुतर्फा असलेली अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात केली. रस्त्यालगत असलेले अतिक्रमण तात्पुरत्या स्वरूपात काढण्यात आली. यास विरोध करणार्‍या सुमारे 6 ते 7 जणांना सरकारी वाहनांमध्ये बसवून पोलीस स्टेशनकडे नेण्यात आले.अतिक्रमणधारकांना तोंडी आदेश देण्यात आले. रस्त्यालगत असलेले अतिक्रमण काढून घेण्यात यावे, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा आदेश पोलिसांनी यावेळी दिला.

तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या सुपा शहरात सुमारे 12 ते 13 गावांतील नागरिकांची ये-जा आहे. मुख्य म्हणजे औद्योगिक वसाहत झपाट्याने वाढत चालली असल्याने कंपनीचे अधिकारी, कामगार, नोकरीनिमित्त आलेले नागरीकांचे मोठे वास्तव्य आहे. सुपा-पारनेर रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे वाढली असल्यामुळे याठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होते. बुधवारी बाजाराच्या दिवशी तर नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. शेतकरी आपली भाजी विकण्यासाठी रस्त्याच्याकडेला बसले तर हे अतिक्रमणधारक त्यांचा भाजीपाला रस्त्यावर फेकून देतात, असे प्रकार अनेकदा घडले आहेत.

दरम्यान तहसीलदार ज्योती देवरे यांनी पारनेर तहसील समोरच्या अतिक्रमणावर हातोडा उगारला असल्याने देवरे यांचे नागरिकांनी स्वागत केले. त्याच धर्तीवर सुपा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने या कारवाईचे स्वागत केले जात आहे.

अतिक्रमीत जागेतील टपर्‍यांचे भाडे दुसर्‍याच्या खिशात

सुपा-पारनेर रस्त्याच्या दुतर्फा अनेकांनी रस्त्यालगत अतिक्रमण करून टपर्‍या थाटल्या आहेत. या टपर्‍या दुसर्‍याला भाड्याने देऊन प्रती महिना पाच ते सहा हजारांची कमाई त्या टपरीधारकाला मिळते. यामुळे जुने पोलीस स्टेशन परिसरात अतिक्रमण करण्याची स्पर्धाच लागली आहे. याकडे गेली अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागासह पोलीस प्रशासनाने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. मात्र पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्यासारखा पोलीस अधिकारी सुपा पोलीस स्टेशनला लाभल्याने पोलीस प्रशासन या अतिक्रमणविरोधात काय भूमिका घेते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर पोलिसांच्या या कारवाईला तहसीलदारांनी पाठबळ द्यावे व कारवाईत राजकीय हस्तक्षेप होऊ नये, असे नागरिक कारवाईच्या ठिकाणी बोलत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या