दिल्लीचा विजयरथ हैदराबादने रोखला

jalgaon-digital
2 Min Read

आबुधाबी । वृत्तसंस्था

हैदराबादचा फिरकीपटू रशिद खानने दिल्लीच्या फलंदाजांना चांगलेच नाचवले.

हैदराबादने दिल्लीपुढे ठेवलेले 163 धावांचे आव्हान फार मोठे नव्हते. पण रशिद खानच्या भेदक गोलंदाजीमुळे यावेळी हैदराबादला स्पर्धेतील पहिला विजय साकारता आला. त्याचबरोबर दिल्लीचाही या हंगामातील हा पहिला पराभव ठरला आहे. रशिद खानने यावेळी चार षटकांमध्ये फक्त 14 धावा देत तीन फलंदाजांना बाद केले.

हैदराबादच्या 163 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारने आपल्या पहिल्याच षटकात दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी सावला बाद केले, पृथ्वीला यावेळी दोन धावाच करता आल्या. त्यानंतर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने थोडा वेळ चांगली फलंदाजी केली, पण त्यालाही मोठी खेळी साकारता आली नाही. अय्यर 17 धावांवर असताना त्याला हैदराबादचा फिरकीपटू रशिद खानने माघारी धाडले.

अय्यर बाद झाल्यावर शिखर धवन आणि रिषभ पंत यांच्याकडून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. पण धवन यावेळी 34 धावावर बाद झाला आणि ही जोडी फुटली. पण त्यानंतर पंतने आपली धडाकेबाज फटकेबाजी सुरुच ठेवली. पण अखेरच्या षटकांमध्ये मोठी फटकेबाजी करण्याच्या नादात पंतही बाद झाला. पंतला यावेळी 28 धावांवर समाधान मानावे लागले.

तत्पूर्वी, दिल्लीच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि हैदराबादच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी यावेळी संघाला सावध सुरुवात करून दिली. पण स्थिरस्थावर झाल्यावर या दोघांनी चांगली फटकेबाजी करायला सुरुवात केली. वॉर्नर आणि बेअरस्टो यांनी संघाला 77 धावांची सलामी करून दिली.

पण दिल्लीचा फिरकीपटू अमित मिश्राने यावेळी वॉर्नरला बाद करत हैदराबादला पहिला धक्का दिला. वॉर्नरने यावेळी 33 चेंडूंत 45 धावांची खेळी साकारली. वॉर्नर बाद झाल्यावर काही वेळातच मनीष पांडेच्या रुपात हैदराबादला दुसरा धक्का बसला, पांडेला फक्त तीन धावाच करता आल्या. मिश्रानेच यावेळी हैदराबादला दुसरा धक्का दिल्याचे पाहायला मिळाले.

पांडे बाद झाल्यावर आयपीएलच्या या हंगामात पहिल्यांदाच मैदानात उतरला तो केन विल्यमसन. पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या विल्यमसनने यावेळी दमदार फलंदाजीचा नमुना पेश केला. त्याचबरोबर जॉनी बेअरस्टोने यावेळी अर्धशतकही झळकावले.

पण अर्धशतक झळकावल्यावर जॉनीला जास्त धावा करता आल्या नाहीत. यावेळी जॉनी 53 धावांवर बाद झाला. जॉनी बाद झाल्यावर विल्यमस संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि जोरदार फटकेबाजी सुरु केली. विल्यमसनने यावेळी 26 चेंडूंत 41 धावांची खेळी साकारली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *