Friday, April 26, 2024
Homeनगरउन्हाळ कांद्याला जूनमध्ये मिळणार 20 ते 25 रुपये भाव

उन्हाळ कांद्याला जूनमध्ये मिळणार 20 ते 25 रुपये भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

येणार्‍या जून महिन्यातच उन्हाळी कांद्याचा भाव 20 ते 25 रुपयापर्यंत उचल खाईल, असा अंदाज राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व ज्येष्ठ अनुभवी कांदा व्यापारी सुरेश बाफना यांनी व्यक्त केला आहे. आजपर्यंत बाफना यांनी वेळोवेळी आपल्या अनुभवातून कांदा साठवणूक व विक्रीबाबत माहिती देऊन शेतकर्‍यांचा मोठा फायदा करून दिलेला आहे.

- Advertisement -

बाफना म्हणाले, यावर्षी पावसाळ्यात टाकलेली रोपे खराब झाल्याने मार्चमध्ये तयार होणारा हजारो टन कांदा स्टॉकमध्ये न जाता खराब होईल, या भीतीने व भावही बरे असल्याने शेतकर्‍यांनी विकून टाकला. उन्हाळी कांद्याची दरवर्षीपेक्षा जास्त लागवड असल्याने कांदा विकून टाकणारे अनेक शेतकर्‍यांमध्ये बंपर उत्पादन होईल व पुढे भाव राहतील की नाही? ही दाट शंका होती.

डिसेंबर-जानेवारीमध्ये लागवड झालेल्या कांद्याच्या उत्पादनात जवळपास 30 ते 40 टक्के घट आली आहे. तर जानेवारी व फेब्रुवारीमध्ये लागवड झालेल्या कांद्यात 50 टक्केपर्यंत घट आलेली आहे. त्यामुळे लागवड जास्त होऊ नये पण मोठ्या प्रमाणात घट दिसत आहे. त्यातूनही अनेक शेतकर्‍यांची बियाण्यात फसवणूक झाल्याने डेंगळे पांढरा कांदा निघाल्याने उत्पन्न कमी होण्याच्या अडचणी अनेकांना आल्या आहेत.

एप्रिल व मे महिन्यात दक्षिणेकडील खरेदीदार राज्यात जास्त असतात. परंतु यावर्षी दक्षिणेबरोबरच एमपी, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार राज्यात 50 ते 60 टक्के पीक आहे. आज संपूर्ण भारतासाठी राज्यात कांदा ग्राहक खरेदी करीत असल्याने मोठ्या प्रमाणावर कांदा उठाव आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने उत्पन्न व साठवणूक दोन्हीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे उन्हाळी कांद्याचा दरवर्षीच्या तुलनेत 50 ते 60 टक्के स्टॉक दिसत आहे. एप्रिल व मे महिन्यात उत्तर भारतात शक्यतो महाराष्ट्रातून कांदा जात नाही. परंतु यावर्षी हजारो ट्रक माल उत्तर भारताकडे राज्यातून जात आहे. त्यामुळे यावर्षी जूनमध्येच कांद्याचे भाव 20 ते पंचवीस रुपये प्रतिकिलोपर्यंत जाण्याचा अंदाज बाफना यांनी व्यक्त केला आहे.

तसेच जूननंतर होणारा पाऊस, लालकांद्याची होणारी लागवड, चाळीतील कांद्याचे टिकण्याचे प्रमाण यावर पुढील ऑगस्टपर्यंतच्या भावाचे अंदाज ठरविता येतील. बाफना यांनी अनेकवेळा राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शनातून शेतकर्‍यांना कांदा भाव साठवणूक विक्री याबाबतीत सल्ला देताना अनेक शेतकर्‍यांच्या कांद्याला मौलिक सल्ल्यातून सोन्याचा भाव मिळवून दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या