Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगBlog : आत्महत्या प्रतिबंध सर्वांची जबाबदारी

Blog : आत्महत्या प्रतिबंध सर्वांची जबाबदारी

निलेश जेजुरकर

जागतिक आरोग्य संघटनेमार्फत (World Health Organization) 10 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ (World Suicide Prevention Day) म्हणून साजरा केला जातो. एक विशिष्ट दिवस आत्महत्या प्रतिबंध या विषयाला देण्याचे कारण आत्महत्या (Suicide) ही जागतिक स्तरावरची एक समस्या आहे. जगात दरवर्षी आठ लाखांपेक्षा जास्त व्यक्ती आपले आयुष्य संपवतात.

- Advertisement -

भारताचा (India) विचार केला तर दरवर्षी 1 लाख 40 हजार लोक मृत्यूला जवळ करतात. याच्या 20 पट म्हणजे जवळजवळ 25 लाख भारतीय दरवर्षी आत्महत्येचा प्रयत्न करतात. उद्याची महासत्ता बनू पाहणाऱ्या, तरुणांचा देश म्हणवणार्‍या आपल्या भारतापुढे हे खूपच मोठे आव्हान आहे. 15 ते 30 वयोगटातील व्यक्तींचा विचार करता त्यांच्यामध्ये आत्महत्या हे मृत्यूचे सर्वात प्रमुख कारण आहे.

म्हणूनच आत्महत्या प्रतिबंध ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आत्महत्या म्हटले की त्याबरोबर अनेक गैरसमज समाज मनात आहेत. केवळ कमकुवत मनाच्या व्यक्तीच आत्महत्या करतात. जे सारखे बोलून दाखवतात ते आत्महत्या करीत नाहीत, आत्महत्या प्रतिबंध हा आरोग्याचा आणि डॉक्टरांशी संबंधित विषय आहे किंवा सर्वच आत्महत्या टाळता येतात का?

या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना असे वाटते की, आपल्या देशाच्या विशाल लोकसंख्येचा विचार करता मानसिक आरोग्य विषयात काम करणारे प्रशिक्षित मनुष्यबळ आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाही. म्हणून आपल्यातील प्रत्येकाला आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीसाठी मानसिक प्रथम उपचार अर्थात सायकॉलॉजिकल फर्स्ट एड देण्यासाठी तयार राहणे आवश्यक आहे.

आत्महत्या आणि कायदा

2017 पूर्वी आत्महत्येचा प्रयत्न हा आयपीसी ३०९ अंतर्गत गुन्हा मानला जात होता, पण त्यामुळे असे प्रकार लपवले जायचे. त्यांचा उपचार करताना डॉक्टरांना अडचण व्हायची आणि मानसिक उपचारांपासूनदेखील ती व्यक्ती वंचित राहत होती. मानसिक आरोग्य कायदा 2017 मधील कलम 115 अनुसार आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा नाही.

अशी प्रत्येक व्यक्ती ही तीव्र प्रकारच्या तणावाचा सामना करीत आहे असे गृहीत धरले जाते. काही अपवादात्मक परिस्थितीत केवळ इतरांना त्रास देण्यासाठी कोणी असे कृत्य करीत असेल तरच आयपीसी ३०९ प्रमाणे गुन्हा नोंदवला जाऊ शकतो, पण तसे सिद्ध करणे महत्वाचे आहे.

मानसिक आरोग्य कायदा 2017 मधील 115 (ए) या उपकलमानुसार आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तीव्र मानसिक तणाव असल्याने त्याची उपचार व पुनर्वसनाची जबाबदारी ही शासनाची असेल, असे नमूद करण्यात आले आहे.

एक व्यक्ती म्हणून आपण काय करू शकतो?

  • धोक्याची लक्षणे ओळखा, जसे: नैराश्याची लक्षणे, वागण्यातील बदल, मरणाचे विचार किंवा इच्छा व्यक्त करणे, निरोपाची व निर्वाणीची भाषा बोलणे, तशी कृती करणे या गोष्टी वेळीच ओळखल्या पाहिजेत.

  • मोकळेपणाने विचारा: एखाद्या व्यक्तीमध्ये अशी काही लक्षणे दिसत असतील तर मोकळे विचारा. घाबरू नका. विचारल्याने कोणी आत्महत्या करीत नाही. पूर्वी प्रयत्न केले, तणावग्रस्त, व्यसनाधीन, आर्थिक गर्तेत अडकलेले जे निराश हताश दिसत आहेत त्यांना मोकळेपणे विचारा. जे बोलून दाखवत आहेत त्यांना चॅलेंज करू नका. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हला शक्य नसेल तर इतर कुणाला तरी मदतीसाठी घ्या, पण अशी बाब लक्षात येता गोपनीय ठेवायचा विचार करू नका.

  • वेळीच तज्ञ व्यक्तीचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्या. मानसोपचार तज्ञांना भेटून उपचार सुरू करा. तोपर्यंत त्या व्यक्तीला एकटे सोडू नका.

  • कोणी उपचार घेत असेल तर त्याला औषध बंद करण्याचा सल्ला देऊ नका.

  • सपोर्ट ग्रुप, सायकॉलॉजीकल फर्स्ट एड, हेल्पलाईन अशा विविध उपक्रमांत आपण स्वयंसेवक म्हणून काम करू शकतात.

एक समाज म्हणून काय करायचे?

  • मानसिक आरोग्याबाबत जनजागृती

  • स्टीग्मा घालवणे

  • मदत गट स्थापन करणे

  • आर्थिक अडचणीत असतील त्यांना मायक्रो फायनान्सची मदत

  • व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न

आत्महत्या आणि त्याच्या बातम्या प्रसारीत करताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. एखाद्या सेलिब्रिटींची आत्महत्येच्या बातमीबाबत काम करताना आत्महत्येचे उदात्तीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यातून आत्महत्या टाळता येऊ शकते आणि मदत उपलब्ध आहे हाच संदेश जाणे महत्वाचे!

प्रशासनाची जबाबदारी

आत्महत्या प्रतिबंध पॉलिसी, यात केवळ आरोग्य विभाग न राहता प्रत्येक विभागाची जबाबदारी निश्चित व्हावी. गृहखाते, न्याय व्यवस्था, महसूल, शेतकी खाते, महिला व कुटुंब कल्याण आणि सामाजिक न्याय असे सर्व. स्कूल मेंटल हेल्थ प्रोग्राम, नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम यांची प्रभावी अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. आत्महत्या प्रतिबंध ही आपली वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदारी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या