Friday, April 26, 2024
Homeनाशिकजिल्ह्यातील लसीकरण वाढवण्याच्या सूचना

जिल्ह्यातील लसीकरण वाढवण्याच्या सूचना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

ग्रामीण भागात करोना प्रतिबंधक लसीकरण ( Corona Vaccination ) मोहिमेला चांगला वेग आला आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील 14 लाख 4 हजार 87 ग्रामस्थांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या निफाड ( Niphad Taluka ) तालुक्याने लसीकरणात आघाडी घेतली आहे. ग्रामीण भागातील 14 लाख 4 हजार 87 ग्रामस्थांचे तर निफाड तालुक्यात सर्वाधिक 1 लाख 90 हजार इतके लसीकरण झाले आहे.

- Advertisement -

प्रारंभीच्या काळात लसीकरण मोहिमेला ग्रामीण भागात थंड प्रतिसाद मिळत होता. मात्र महिन्यापासून सर्वच तालुक्यांमध्ये लसीकरणाला ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांचे लसीचे दोन्ही डोसही पूर्ण झाले आहेत. लसीकरणाच्या बाबतीत जिल्ह्यातील निफाड, नाशिक, सिन्नर, दिंडोरी आणि मालेगाव या तालुक्यांमध्ये लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून दोन लाखांपर्यंत हा आकडा पोहोचला आहे. तर इगतपुरी, येवला, चांदवड, सटाणा व नांदगाव हे तालुकेदेखील लाखाच्या उंबरठ्यावर उभे आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील 14 लाख 4 हजार 87 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पूर्व भागातील तालुक्यांमध्ये लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत असला तरी, पश्चिम पट्ट्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, देवळा या आदिवासी तालुक्यांमधून अद्यापही कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. पेठ व सुरगाणा तालुके लसीकरणात पिछाडीवर आहेत.

लसीकरण वाढवण्याच्या सूचना

अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांना बोलावून घेत ग्रामीण भागात सुरू असलेल्या लसीकरणाचा आढावा घेतला. कोणत्या तालुक्यात लसीकरण कमी आहे त्या भागात लसीकरण वाढवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्याच्या दृष्टीने नियोजन आरोग्य विभागाने करावे, असे आदेशही अध्यक्ष क्षीरसागर यांनी यावेळी दिले.

तालुकानिहाय लसीकरण

निफाड- 1 लाख 582, नाशिक- 1 लाख 34 हजार 922, सिन्नर- 1 लाख 14 हजार आठ, दिंडोरी- 1 लाख 819, मालेगाव- 1 लाख 35 हजार 689, इगतपुरी- 99 हजार 104, त्र्यंबकेश्वर- 56 हजार 169, पेठ -42 हजार 230, सुरगाणा- 47 हजार 293, येवला- 81 हजार 650, देवळा- 71 हजार 153. चांदवड -83 हजार 738, सटाणा- 89 हजार 716, नांदगाव- 86 हजार 754, कळवण- 70 हजार 260.

- Advertisment -

ताज्या बातम्या