अकोले |प्रतिनिधी| Akole
खोटा गुन्हा दाखल करुन त्यात दोन महिने न्यायालयीन कोठडीत राहिल्याने नैराश्यातून अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक फाटा येथील 22 वर्षीय तरुणाने मंगळवारी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
सुदर्शन चंद्रकांत राजगुरू (22 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अकोले पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत समजलेल्या माहितीनुसार अकोले तालुक्यातील सुगाव फाटा येथील या तरुणांने राहत्या घरात छताच्या अॅगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्ये पूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली होती.
ती पोलिसांना त्याच्या खिशात मिळाली आहे. त्यामध्ये त्याने लिहीले आहे, तो नाशिक येथे कंपनीत नोकरीस असताना त्याच्या वर एक खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये त्यास दोन महिने न्यायालयीन कोठडीत राहावे लागले होते. यावेळी त्याचे वडिलांकडे फिर्यादीने गुन्हा मागे घेण्यासाठी दोन लाख रूपयांची मागणी केली होती. गुन्हा दाखल होऊन जेलमध्ये राहावे लागल्याने तो काम करत असलेल्या व त्याचा उदरनिर्वाह होत असलेल्या कंपनीनेही त्याला नोकरीवरून काढून टाकले.
तसेच या घटनेने समाजाच्या नजरेतून उतरल्याने आपल्याला जीवन जगणे कठीण झाले आहे. आपण खोटा गुन्हा दाखल करणार्याच्या त्रासाने आत्महत्या करत असून त्यांना जबाबदार धरून कडक शिक्षा व्हावी, असे या चिठ्ठीत लिहिलेले असल्याचे समजते. याबाबत अकोले पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास सुरु असून चौकशीअंती काही निष्पन्न झाल्यास गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.