Thursday, April 25, 2024
Homeनगरऊसतोड मजुरांना बेदम मारहाण, पिस्तुल दाखवून धमकी

ऊसतोड मजुरांना बेदम मारहाण, पिस्तुल दाखवून धमकी

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

श्रीगोंदा तालुक्यातील बांगर्डे येथील आदिवासी समाजातील ऊस तोडणी कामगार कुटुंबास मुकादम व त्याच्या सहकार्‍यांनी बेदम मारहाण केली. तसेच दाखल केलेली फिर्याद मागे घेण्यासाठी पिस्तुल दाखवून धमक्या दिल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे संपूर्ण कुटुंब दहशतीखाली असून त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी एकलव्य संघटनेने केली आहे.

- Advertisement -

शिवाजीराव ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांची भेट घेऊन ही मागणी केली. यावेळी संघटनेचे जिल्हा सचिव सोमनाथ गोरे, जिल्हा संघटक कानिफ बर्डे, टायगर फोर्स जिल्हा उपाध्यक्ष अंकुश गायकवाड, होलार समाजाचे अध्यक्ष लखन पारसे, एकलव्य संघटनेचे हौसराव गोरे, सुभाष गायकवाड, ज्ञानदेव बर्डे, शिवाजी बर्डे आदी उपस्थित होते.

याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील बांगर्डे येथील राधिका देविदास बर्डे या महिलेने फिर्याद दिली आहे, त्यांचा मुलगा राहुल बर्डे याच्या दुचाकीला अपघात झाल्याने त्याचे वडील देविदास व आई राधिका बांगर्डे यांनी कारखान्यासाठी सुरू असलेली ऊसतोड थांबवून ते तातडीने गावी आले व मुलास उपचारासाठी दाखल केले. यामुळे त्यांना कारखान्यावर ऊस तोडणी कामासाठी जाता आले नाही. 28 जानेवारी बांगर्डे येथे त्यांच्या घरी संशयित हनुमंत आजबे (रा. शिराळ, ता. आष्टी, जि.बीड) नाना देवराव शेळके व महादेव गुलाब शेळके दोघे (रा.बांगर्डे, ता. श्रीगोंदा) व एक अनोळखी व्यक्ती यांनी बर्डे कुटुंबियांना ऊस तोडणीचे काम सोडून का आला असे म्हणून शिवीगाळ करून बेदम मारहाण केली.

देविदास बेर्डे यांचे अपहरण करून स्कॉर्पिओ गाडीमध्ये बळजबरीने त्यांना कर्जत तालुक्यातील जंगलात व तेथून साखर कारखाना येथे घेऊन गेले. याठिकाणी मारहाण करून डांबून ठेवले. याप्रकरणी राधिका बर्डे यांच्या तक्रारीवरून संशयित आजबे, शेळके यांच्यावर अपहरण, मारहाण तसेच अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

मात्र अद्याप यातील प्रमुख तीन आरोपी हे फरार आहेत. या घटनेनंतर संशयित महादेव शेळके याने बर्डे यांच्या घरी जाऊन पिस्तुल दाखवत पोलीस केस पाठीमागे घ्या व पैसे परत द्या अन्यथा जीवे मारू, अशी धमकी दिली. यामुळे हे कुटुंब दहशतीत आहे. संबंधित संशयितांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या