Thursday, April 25, 2024
Homeनगरउसाचे तुकडे वाहतूक करणार्‍या उघड्या वाहनांना आपघातानंतर शिस्त लागणार का?

उसाचे तुकडे वाहतूक करणार्‍या उघड्या वाहनांना आपघातानंतर शिस्त लागणार का?

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

ऊस गळीत हंगाम सुरू झाल्याने बाभळेश्वर ते नेवासाफाटा या राज्यमार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली आहे. खडबडीत झालेला राज्यमार्ग आणि तोडणी यंत्राद्वारे तोडणी केलेले उसाचे तुकडे भरधाव वेगात जाणार्‍या उघड्या वाहनातून नेली जात आहेत. राज्यमार्गावर उसाचे तुकडे पडून होणारे अपघात रोखण्यासाठी या वाहनांना शिस्त लावण्याकडे श्रीरामपूर उपप्रादेशिक परीवहन कार्यालयाचे दुर्लक्ष होत असल्याने या वाहनांवर कारवाई कोण करणार? राज्यमार्गावर एखादा अपघात झाल्यावर कारवाईचा बडगा उगारणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

ऊस गळीत हंगाम सुरू होऊन महिन्याचा कालावधी होत आहे. बाभळेश्वर ते नेवासाफाटा या राज्यमार्गावरून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक केली जात आहे. अगस्ती, संगमनेर, युटेक, कोळपेवाडी, संजिवनी, प्रवरानगर, गणेशनगर, अशोक या सर्वच साखर कारखान्यांची तर भेंडा, सोनई व गंगामाई या कारखान्यांचीही वाहने काही प्रमाणात या राज्यमार्गावरून उसाची वाहतूक करीत असतात. दिवसेंदिवस ऊस तोडणी मजुरांची टंचाई भासू लागल्याने सर्वच कारखान्यांनी ऊसतोडणी यंत्रांना पसंती दिली आहे.

तोडणी केलेल्या उसाचे बारीक तुकडे करून हे तुकडे ट्रक किंवा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरून कारखान्यापर्यंत नेले जातात. ही वाहने अक्षरशः शिग लावून भरलेली असतात. सुरक्षेची काळजी न घेता ही उघडी वाहने खडबडीत रस्त्यावरून जात असताना या वाहनांतून उसाचे तुकडे राज्यमार्गावर सांडतात. दुर्दैवाने त्याचवेळी दुचाकिस्वार किंवा चारचाकी वाहन जात असेल तर अपघात झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. निरपराध प्रवाशांना या अपघाताच्या यातना सोसाव्या लागल्या आहेत. त्यापैकी अनेकांना दुखापती होऊन कायमचे अपंगत्वही आलेले आहे तर चारचाकी वाहन चालकांनाही मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.

राज्य मार्गावर या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची वाहने नेहमीच चकरा मारताना दिसतात. नियम तोडून रस्त्यावर फिरणार्‍या वाहनांवर कारवाई करून दंडही वसूल केला जातो. वाहनांना शिस्त लावण्याची जबाबदारी परिवहन विभागाची असतानाही अपघातास निमंत्रण देणार्‍या या वाहनांकडे दुर्लक्ष का होते? वास्तविक ही वाहने ताडपत्रीने झाकून राज्यमार्गावर येणे आवश्यक आहे. एरवी छोट्या छोट्या चुका करणार्‍या वाहनांवर कारवाईची तत्परता दाखवणारे हे कार्यालय निरपराध प्रवाशांच्या जिवीताशी खेळणार्‍या या उघड्या वाहनांवर कारवाईची तत्परता का दाखवत नाही? की एखादा निरपराध प्रवाशी या अपघाताची शिकार झाल्याशिवाय परिवहन विभागाला जाग येणार नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जाऊ लागल्याने या कार्यालयाने वेळीच या उघड्या वाहनांवर ताडपत्रीचे झाकण टाकण्यासाठी कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या