उसाला एफआरपी अधिक दोनशे रूपये भाव जाहिर करा

jalgaon-digital
2 Min Read

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

सर्व साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामात एफआरपी अधिक 200 रुपये प्रती टन भाव जाहीर करावा. तसेच काही कारखान्यांनी मागील हंगामाच्या एफआरपीच्या फरक रक्कमेमधून केलेल्या कपातीची रक्कम संबधित उस उत्पादक शेतकर्‍याना दिवाळी द्यावी. अन्यथा दिवाळीच्या दिवशी येथील तहसील कार्यालयासमोर चटणी भाकर खावून उस उत्पादक शेतकर्‍यांचे तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार तालुक्यातील विविध शेतकरी संघटनांनी जाहीर केला.

शेवगाव येथे तहसीलदार छगनराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत सर्व समावेशक निर्णय जाहीर झाला नाही. त्यामुळे येत्या दिवाळीच्या दिवशी प्रसंगी आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठविण्याचा निर्धार स्वाभिमानीचे रावसाहेब लवांडे, दत्तात्रय फुंदे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण, तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, कॉ.भगवान गायकवाड, बबनराव पवार आदींनी यावेळी जाहीर केला.

मागील वर्षीच्या हंगामात शेतकर्‍यांना उस तोडणीसाठी द्यावे लागलेले पैसे परत मिळावे, कारखान्यांचे वजन काटे ऑनलाईन करावेत, कार्यक्षेत्रातील उसाची प्राधान्याने तोडणी करावी, अशा विविध मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी तसेच ज्या कारखान्यांकडे इथेनॉल, मळी, कोजनरेशन, अल्कोहोल असे अन्य पूरक उत्पादने (बाय प्रोडक्ट) घेतले जातात. त्यातील लाभांश संबधित कारखान्यांनी शेतकर्‍यांना देण्यासाठी अधिक भाव द्यायला हवा. आदी आग्रही मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या बैठकीत साखर संघाचे प्रतिनिधी संतोष पवार यांच्यासह वजनपामे निरीक्षक, मोटार वाहन निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, महसूल प्रशासन यांच्यासह परिसरातील ज्ञानेश्वर, केदारेश्वर, गंगामाई, वृद्धेश्वर कारखाना तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी, कम्युनिस्ट पक्षासह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *