Friday, April 26, 2024
Homeनगरउशिरा तुटलेल्या उसाला एकरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी- अ‍ॅड. काळे

उशिरा तुटलेल्या उसाला एकरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी- अ‍ॅड. काळे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

उशिरा तुटलेल्या ऊसाला एकरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. अजित काळे यांनी शेतकरी संघटनेच्या बैठकीत केली.

- Advertisement -

शेतकरी संघटनेच्यावतीने दि. 16 एप्रिल 2022 रोजी आयोजित ऊस परिषदेच्या नियोजनासाठी शेतकरी संघटनेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, संपर्क प्रमुख शिवाजी जवरे, युवा आघाडी प्रमुख बच्चू मोढवे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप, नेवासा तालुकाध्यक्ष हरिभाऊ तुवर, भास्कर तुवर, संदीप उघडे, विलास कदम, बाळासाहेब शिरसाठ, गोविंदराव वाघ, सुदामराव औताडे, अ‍ॅड. सर्जेराव घोडे, विष्णुपंत खंडागळे, किशोर पाटील, छावाचे नितीन पटारे, कैलास पवार, संजय वमने, शरद पवार, बबन उघडे, प्रभाशंकर तुवर, मनोहर मटकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यासह जिल्ह्यात उपस्थित झालेल्या अतिरिक्त उसाच्या प्रश्नाच्या अनुषंगाने ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.16 एप्रिल रोजी श्रीरामपूर येथील लक्ष्मी त्रिंबक मंगल कार्यालयात दुपारी 1 वा. ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेमध्ये विविध मागण्यांचा विचार विनिमय होणार आहे. त्यात प्रामुख्याने दोन साखर कारखान्यासह दोन इथेनॉल कारखान्यांमधील हवाई अंतराची 25 किलोमीटरची अट रद्द व्हावी, स्व. गोपिनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची दहा रुपयांची कपात ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या बिलातून रद्द करावी, उशिरा तुटलेल्या उसाला एकरी 25 हजार रुपये व गाळपाअभावी शिल्लक राहिलेल्या उसाला एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, विज बिल, पाणीपट्टीसह संपूर्ण कर्जमाफी मिळावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.

दि.16 एप्रिल रोजी होणार्‍या ऊस परिषदेसाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असून अ‍ॅड. अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद होणार आहे. शेतकर्‍यांनी हजारोंच्या संख्येने यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केलेे.

- Advertisment -

ताज्या बातम्या