बारवेटरचा मुलगा, बनला अब्जाधिश

माझा जन्म 1948 मध्ये अमेरिकेतील इलिनोइसमधील माउंट वर्नोनमध्ये झाला. माझे वडील एका स्थानिक बारमध्ये वेटर म्हणून काम करत होते. आम्हा तीन भावंडांमध्ये मी सर्वांत मोठा होतो. लहानपणापासूनच मला आर्थिक तंगीला, बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले. मी दक्षिण इलिनोइस युनिव्हर्सिटीमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. घरच्या अखंड गरीबीमुळे माझ्या मनात सदैव श्रीमंत बनण्याची इच्छा असायची.

एकदा आमच्या शिक्षकांनी वर्गामध्ये सर्वांना ‘तुम्हाला पुढे जाऊन कोण बनायचे आहे’ हा प्रश्‍न विचारला. तेव्हा माझ्यासोबतच्या विद्यार्थ्यांपकी अनेकांनी डॉक्टर, शिक्षक, वकील आदी करिअरविषयी सांगितले. पण मी ‘मला श्रीमंत व्हायचे आहे’ असे ठाम उत्तर दिले. घरच्या परिस्थितीमुळे मी कमी वयातच नोकरी करु लागलो, जेणे करुन वडिलांना थोडा हातभार लागेल. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच मी लोकांना इन्शुरन्स विकायचो. पदवीनंतर मी माझा मित्र स्टीव्ह स्मिथ याच्यासोबत एक्सल नावाची एक कंपनी स्थापन केली. या कंपनीतर्फे आम्ही सुदुर अंतरावरच्या लोकांना फोनची सेवा द्यायचो.

स्मिथला नेटवर्किंग मार्केटच्या व्यवसायात प्रचंड आवड होती. या रुचीमुळेच आम्हाला कंपनी सुरु करताना मोठी मदत झाली. कंपनीचा विस्तार होण्यासाठी आम्ही दोघांनी अपार मेहनत घेतली. अवघ्या 9 वर्षांमध्ये आमच्या कंपनीने अक्षरशः अब्जावधी डॉलर्सची कमाई केली. पाहता पाहता एक्सेल अमेरिकेतील सर्वांत गतीने विकास करणारी कंपनी बनली. तिने मायक्रोसॉफ्टलाही मागे टाकले. 1996 मध्ये आम्ही न्युयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये एक्सेलची नोंदणी केली. एनआयएसईमध्ये नोंदणी झालेली ती सर्वांत ‘युवा’ कंपनी ठरली. पुढील वर्षी जूनमध्ये एक्सलने टेल्को कम्युनिकेशन्स समूहाचे अधिग्रहण केले. पुढे या कंपनीचे 1998 मध्ये टेलीग्लोबचे विलीनीकरण केले. या विलीनीकरणातून आम्हाला प्रचंड फायदा झाला आणि मी रातोरात अब्जाधिश बनलो.

1999 मध्ये सीईओ पदावरुन मी सेवानिवृत्त झालो. आता मी माउंट वर्नोन इनव्हेस्टमेंट कंपनीच्या चेअरमनपदी विराजमान आहे. गरीबी अत्यंत जवळून पाहिल्यामुळे पैसा आणि मेहनत यांचे मूल्य मी समजू शकतो. त्यामुळेच मी अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच अनेक अचल संपत्तीचीही खरेदी केली आहे. घोड्यांचे फार्महाऊसही आहे. तसेच मी आता तरुणांची बास्केटबॉलची टीमही सुरु केली आहे.

जर तुम्ही जिद्दीने, सचोटीने कठोर मेहनत करत असाल आणि जर तुम्हाला व्यवसायाची समज अचूक असेल तर तुम्ही नक्की यशस्वी होता, यात शंकाच नाही !

– केनी ट्राउट


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *