Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनिर्यातक्षम द्राक्षासाठी देण्यात येणारे अनुदान बंद; द्राक्ष उत्पादकांसमोरील अडचणीत वाढ

निर्यातक्षम द्राक्षासाठी देण्यात येणारे अनुदान बंद; द्राक्ष उत्पादकांसमोरील अडचणीत वाढ

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

निर्यातक्षम द्राक्ष उत्पादकांसमोरील अडचणी कमी होण्याचे नाव घेत नसून या अडचणींमध्ये वाढच होत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष उत्पादकांना नेहमीच फटका बसत आलेला आहे. यातून काही मार्ग निघेल का या चिंतेत असताना आता निर्यातक्षम द्राक्षासाठी देण्यात येणारे अनुदान बंद करण्यात आले आहे. यामुळे द्राक्ष उत्पादकांसमोर चिंतेचे वातावरण आहे.

- Advertisement -

द्राक्ष हंगाम सुरू होताच केंद्र शासनाने शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे.या निर्णयामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. निर्यातक्षम द्राक्षासाठी देण्यात येणारे एक लाख 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान शासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच कंटेनरच्या भाड्यामध्येही दोन लाख रुपयांनी वाढ झाल्याने एकूण तीन लाख पन्नास हजारांचा फटका निर्यातक्षम द्राक्ष उत्पादकांना बसणार आहे.

केंद्र शासनाने निर्यातक्षम द्राक्षांना देण्यात येणारे अनुदान बंद करण्याबाबत घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातून होत आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास रास्तारोकोचा इशाराही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांतर्फे देण्यात आला आहे.

भाड्यामध्ये केलेली वाढ थांबवावी

जिल्ह्यातील नाशिक सह निफाड दिंडोरी तालुक्यातून द्राक्षांना विदेशात मोठी मागणी असते. मात्र, केंद्राने घेतलेल्या या नवीन निर्णयामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. केंद्र शासनाने 1 लाख 50 हजारांचे अनुदान पुन्हा सुरू करावे, तसेच कंटेनरच्या भाड्यामध्ये केलेली वाढ थांबवावी, अशी मागणी द्राक्ष उत्पादकांकडून होत आहे.

तोटा शेतकऱ्यांच्या माथी : केंद्र सरकारने शेतकऱ्यांबाबत नेहमी चुकीचे धोरण घेतले आहे. तसेच यावेळी तर द्राक्ष निर्यातीबाबत घेतलेला निर्णय हा चुकीचा असून तो तात्काळ मागे घ्यावा. करोनामुळे द्राक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई यंदा होईल, अशी अपेक्षा द्राक्ष उत्पादकांना होती. मात्र, केंद्र सरकारने तीन लाख ५० हजारांचा तोटा शेतकऱ्यांच्या माथी मारला आहे.त्यामुळे तीव्र संतापाची लाट आहे.

विजय सोनवणे, द्राक्ष निर्यातदार

- Advertisment -

ताज्या बातम्या