Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्रातील उद्योग बाहेर पळवण्यासाठीच सत्तांतर; सुभाष देसाईंचा गंभीर आरोप

महाराष्ट्रातील उद्योग बाहेर पळवण्यासाठीच सत्तांतर; सुभाष देसाईंचा गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 22 हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प गमावला आहे. हा प्रकल्प आता गुजरात सरकारकडे सोपवण्यात आला आहे. टाटा एअरबस प्रक्लप गुजरातमध्ये जाण्याच्या घोषणेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क या दोन प्रकल्पानंतर तिसरा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर चहुबाजूने टीका सुरू झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान राज्यातील प्रकल्प गुजरातला नेण्यासाठी सत्तांतर झाले असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी केला. राज्यात तीन महिन्यांपूर्वीच सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार आले. या तीन महिन्यांमध्येच महाराष्ट्रातील तीन मोठे प्रकल्प एकापाठोपाठ गुजरातला गेले. हे तिन्ही प्रकल्प एकाच राज्यात गेले, हा योगायोग म्हणायचा का? यावरुन एक शंका येते की, महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला नेण्यासाठीच राज्यात सत्तांतर घडवून आणण्यात आले का, असा सवाल माजी उद्योगमंत्री आणि ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी उपस्थित केला.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना देसाई म्हणाले की, महाराष्ट्रातील तीन प्रकल्प एकापाठोपाठ गुजरातला गेले आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील कोणत्याही नेत्याने साधा ब्र ही काढलेला नाही. मुळात महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारचा हाच हेतू होता का? महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प पळवण्यासाठीच राज्यात सत्तांतर घडवून आणले होते का? जेणेकरून हे प्रकल्प सुरळीतपणे गुजरातमध्ये नेता येतील आणि कोणीही काही बोलणार नाही, हा केंद्र सरकारचा डाव होता. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला समान न्याय दिला पाहिजे. मात्र, केंद्राकडून तसे होताना दिसत नसून एका राज्याला झुकत माप दिले जात असल्याचे देसाई यांनी सांगितले.

पुढे बोलताना देसाई म्हणाले की, मी हे वक्तव्य विचारपूर्वक करत आहे. महाराष्ट्रातील तिन्ही प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचे एखादे तरी शिष्टमंडळ केंद्र सरकारकडे गेले का? केंद्र सरकारशी बोलण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला का? असे असंख्य सवाल यावेळी देसाई यांनी उपस्थित केले आहे. हिमाचल प्रदेशच्या निवडणूका जाहीर झाल्यात. पण गुजरातच्या निवडणूका जाहीर झाल्या नाहीत. दरवेळेस हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुका एकत्रित जाहीर होतात. यंदा मात्र, योग्य वेळी घोषणा होईल असे निवडणूक आयुक्तांनी म्हणत पत्रकार परिषद आटोपती घेतली. गुजरातमध्ये सध्या विविध प्रकल्पांची घोषणा, भूमिपूजन आदी कार्यक्रम सुरू आहेत. भाजप सरकारला वेळ मिळावा यासाठीच गुजरातची निवडणूक जाहीर झाली नाही का, असा प्रश्न देखील देसाई यांनी उपस्थित केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या