Friday, April 26, 2024
Homeनगरउपसरपंच विधाटे यांच्याविरूद्धचा अविश्वास 13 मतांनी संमत

उपसरपंच विधाटे यांच्याविरूद्धचा अविश्वास 13 मतांनी संमत

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर ग्रामपंचायतीचे उपसरपंच राधाकिसन विधाटे यांच्याविरूद्ध दाखल असलेल्या

- Advertisement -

अविश्वास ठरावाच्या बाजूने लोकनियुक्त सरपंच दत्तात्रय आहेर यांचेसह अन्य बारा सदस्य असे तेरा जणांच्या मतदानाने अविश्वास ठराव संमत झाला आहे. येथे सोसायटी पाठोपाठ ग्रामपंचायतीतही सत्ताधारी माजी आमदार मुरकुटे गट व विरोधी काँंग्रेसचे प्रदेश महासचिव करण ससाणे गटाचा समझोता दिसला.

भोकर ग्रामपंचायत माजी आमदार भानुदास मुरकुटे गटाच्या ताब्यात आहे. या गटाचे लोकनियुक्त सरपंच व 11 सदस्य संख्या आहे तर विरोधी ससाणे गटाकडे 4 सदस्य संख्या आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी येथे सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी दरम्यान मुरकुटे ससाणे गटात समझोता होऊन ससाणे गटाचे सागर शिंदे अध्यक्ष झाले आहेत तर उपाध्यक्ष मुरकुटे गटाच्या सौ.गयाबाई मते यांची बिनविरोध निवड झालेली आहे.

आता ग्रामपंचायतीत उपसरपंच राधाकिसन सिताराम विधाटे यांचेविरूद्ध अविश्वास ठराव दाखल करताना सत्ताधारी मुरकुटे गटाबरोबर ससाणे गटही सामील झाल्याचे दिसले. श्रीरामपूरचे तहसिलदार प्रशांत पाटील यांचेकडे दाखल प्रस्तावावर ससाणे गटाच्या त्या 4 सदस्यांसह मुरकुटे गटाच्या 9 अशा 13 सह्या आहेत. काल येथील ग्रामपंचायत कार्यालयात अध्यासी अधिकारी तहसिलदार प्रशांत पाटील यांनी बोलविलेल्या बैठकीस प्रस्तावावर सह्या केलेले सरपंचासह इतर 12 सदस्य उपस्थीत होते.

या अविश्वास प्रस्तावाबैठकी दरम्यान ग्रामपंचायत सदस्य महेश पटारे यांनी अविश्वास ठराव मांडला त्यास सर्वानुमते राजेंद्र सकाहरी चौधरी यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर उपस्थित सरपंच व 12 सदस्य यांनी हात वर करून मतदान करत हा अविश्वास ठराव दोन तृतीयांश बहुमताने संमत करण्यात आला.

यावेळी तहसिलदार प्रशांत पाटील यांचे समवेत लिपीक निलेश सोनटक्के, तलाठी ज्ञानेश्वर हाडोळे, ग्रामविकास अधिकारी प्रदीप ढुमणे व पोलीस पाटील बाबासाहेब साळवे हे होते. तर बैठकीस सरपंच दत्तात्रय आहेर यांचेसह सदस्य रुक्मिणी खंडागळे, स्वाती चव्हाण, इंदू आहेर, राजेंद्र चौधरी, प्रसाद ओहोळ, मिनाक्षी चव्हाण, महेश पटारे, जयश्री छल्लारे, लता अमोलीक, सागर शिंदे, सुभाष डूकरे व सविता गायकवाड हे उपस्थित होते तर उपसरपंच राधाकिसन विधाटे, इंदूबाई रूपटक्के व किशोर आहेर हे तिघे अनुपस्थित होते.

उपसरपंच राधाकिसन विधाटे यांचेविरूद्ध अविश्वास दाखल झाल्याचे समजताच त्यांनी लागलीच राजीनाम्याची तयारी केली परंतु सलग दोन दिवसांच्या सुटीमुळे त्यांनी सोमवारी म्हणजे अविश्वास ठरावावर मतदान होण्याच्या आदल्या दिवशी ग्रामविकास अधिकारी ढुमणे यांचेकडे उर्वरीत दोन सदस्य इंदूबाई रावसाहेब रूपटक्के व किशोर रतन आहेर या दोन सदस्यांच्या सूचक म्हणून सह्या घेत आपला राजीनामा सादर केला परंतू सरंपच उपचारासाठी रूग्णालयात असल्याने त्यावर सरपंचांची सही होऊ शकली नसल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या