शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी समशेरपूर विद्यार्थी मृत्यूप्रकरणाची घेतली दखल

अकोले |प्रतिनिधी| Akole

अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या समशेरपूर येथील अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी पांडुरंग बाळू सदगीर याचा गेट अंगावर पडल्याने मृत्यू झाला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना अकोले पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी जालिंदर खताळ यांनी शिक्षणमंत्री दिपक केसरकर, शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्याशी पालकांच्या उपस्थितीत संवाद साधला.ग्रामस्थांच्या मागणी नुसार मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या भावाला संस्थेत नोकरी व आर्थिक मदत करण्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दिले.

शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी झालेली घटना ही दुर्दैवी असून संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असल्याचे सांगत कुटुंबियांचे सांत्वन केले. या कुटुंबाला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले. ग्रामस्थांच्या मागणीनुसार मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या भावाला संस्थेत नोकरी लागावी म्हणून स्पेशल केस करून नोकरी दिली जाईल असे सांगितले. पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित शिक्षण विभागाला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

अहमदनगर माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनीही ग्रामस्थांशी संवाद साधत संस्थेच्या वतीने नोकरी देण्याचे व आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेचे जे. डी खानदेशे यांच्याशीही दूरध्वनीवरून सर्व पालकांसमोर संवाद साधला असता त्यांनी संस्थेच्या मिटिंग मध्ये निर्णय घेऊन सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी समशेरपूर केंद्राचे केंद्रप्रमुख नवनाथ वणवे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष पंडित नेहे, दत्ता जाधव, पोपट दराडे, बबनराव सदगीर, चक्रधर सदगीर, नितीन बेनके, बाळू सदगीर, दत्तू सदगीर, सुदाम सदगीर, प्राथमिक शिक्षक बँकेचे व्हा. चेअरमन बाळासाहेब मुखेकर, सरपंच अविनाश गावंडे, संजय मुखेकर, महेश पवार, लक्ष्मण बेनके, राजेश नेहे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *