Friday, April 26, 2024
Homeनाशिककामगारांच्या ‘वेल्फेअर’साठी अहोरात्र धडपडणारा कामगार

कामगारांच्या ‘वेल्फेअर’साठी अहोरात्र धडपडणारा कामगार

नाशिक । Nashik (रवींद्र केडिया)

उद्योगांत नोकरी करताना समाजाचे आपण काही देणे लागतो ही भावना मनात जोपासून गेली 24 वर्षे अखंडपणे कामगार बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी हिरीरीने सहभाग घेणारे पोपटराव देवरे यांनी समाजापुढे आदर्श घालून दिला आहे. ‘करोना’ महामारीच्या काळात त्यांनी रुग्णांना रुग्णालयात उपचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्वेच्छेने प्रयत्न केले.

- Advertisement -

कामगारांनी त्यांना पहिल्यांदा महिंद्र कंंपनीत महिंद्र वेल्फेअरमध्ये ट्रस्टी संचालक पदावर बिनविरोध निवडून दिले. महिंद्र वेल्फेअर फंडाचे सहचिटणीस म्हणून पंचवीस वर्षांपासून अखंडपणे कार्य करत आहेत. वेल्फेअरमध्ये कामगारांना आजारपणात रुग्णालयात दाखल करण्यापासून ते मृत पावलेल्यांवर अंत्यविधी करण्यापर्यंत वेल्फेअरच्या योजनांना मंजुरी व अनलिमीट खर्च करण्यास मान्यता दिली.

कंंपनी वैद्यकीय अधिकारी डॉ. खोपकर यांची भूमिका मोलाची ठरली. महिंद्र कामगार वैद्यकीयदृष्ट्या कितीही अडचणीत असला तरी त्यांना मदतीचा हात देण्यासाठी कंपनीच्या माध्यमातून पोपटराव देवरे 24 तास सज्ज असतात. हे काम करताना कंपनीतील कामात ते कधीही व्यत्यय येऊ देत नाहीत. कामगार म्हणजे आपला सहकारी नव्हे तर नातेवाईकच आहे, असे ते मानतात.

त्यामुळे आजारी अथवा मयत रुग्णाला घेऊन त्यांच्या गावी जाण्याचे असो किंवा अंत्ययात्रेला कुटुंब नसल्यास आपणच कुटुंबीय बनून सोपस्कार पूर्ण करणे असो; कामगार महाराष्ट्रातील असो किंवा परराज्यातील, पोपटराव व त्यांची टीम सदैव तत्पर असते. महिंद्र कंपनीतील कामगारांमध्ये रक्तदानाची प्रथा त्यांनी सुरू केली.

केवळ रक्तदान करून भागणार नसून रक्तदात्यांच्या रक्तगटाची माहितीदेखील संकलित असावी या भावनेतून त्यांनी कामगारांच्या रक्तगटाचा डाटा संकलित करून घेतला. महिंद्र कंपनीने थॅलेसिमिया रुग्ण दत्तक घेतले आहेत. त्यामुळे कोणत्याही थॅलेसिमियाबाधित रुग्णाला किंवा कामगाराला रक्ताची गरज भासते तेव्हा हाच डाटा उपयोगी पडतो.

यासाठी वेगवेगळ्या रक्तगटाच्या 80 कामगारांची टीम सज्ज ठेवण्यात आली आहे. मयत कामगार किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती असो पोपटराव तेथे तत्काळ पोहोचले समजा. तेथे गेल्यावर पोलीस पंचनामा, शवविच्छेदन, अंत्यविधीची व्यवस्था, नातेवाईकांना फोन करणे, कंंपनीत अधिकार्‍यांना माहिती देणे अशी सर्व जबाबदारी पार पाडतात.

प्रत्येक कामगाराच्या नोकरीच्या पहिल्या दिवसाइतकाच सेवानिवृत्तीचाही दिवस आनंदी करण्याचे काम पोपटराव उत्साहपूर्वक करतात. स्वतःला हृदयविकाराचा त्रास असताना आजही कंपनीतील कोणी ‘करोना’बाधित झाले तर त्यांच्या सेवेसाठी ते तत्पर असतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या