Friday, April 26, 2024
Homeनाशिकगोदावरीतून गाळ उपसाच्या नावाखाली होतोय वाळू उपसा

गोदावरीतून गाळ उपसाच्या नावाखाली होतोय वाळू उपसा

नाशिक । Nashik

नाशिक स्मार्ट सिटीच्या अंतर्गत गोदावरी सुशोभिकरणांच्या कामांतर्गत नदीतील गाळ उपसण्याचे सुरु असलेले काम चुकीच्या पद्धतीने सुरु असून यात विनाकारण वाळू उपसा केली जात आहे.

- Advertisement -

हे काम तातडीने बंद करण्यात यावे अशी मागणी स्मार्ट सिटी कंपनी लि.चे संचालक तथा नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे.

महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्यासह काही जणांनी गोदावरी नदीत रामवाडी भागात सुरू झालेल्या गाळ उपस्याच्या निमित्ताने वाळू उपसा केला जास्त असल्याची तक्रार केली होती. नाशिक शहरातील होळकर पुल, रामवाडी पुल, रामवाडी पुल ते फॉरेस्ट नर्सरी पर्यंतचे नदीतील गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

या कामात दिड मीटर गाळ काढण्याचे सांगण्यात आले असून आता चक्क गाळ काढण्याऐवजी गाळ मिश्रीत वाळू काढण्याचे काम सुरु असून त्यासाठी 5 ते 6 मीटर खोल खोदकाम सुरु असल्याचा आरोप बग्गा यांनी केला आहे. दिड मीटर ऐवजी जास्त खोदकाम सुरु असल्याने यावर कोण अंकूश ठेवणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

निरी या संस्थेने रामकुंड, लक्ष्मणकुंड या तीर्थक्षेत्राच्या वरील भागातील नदीपात्रातील वाळू उपसा करण्यास मनाई करण्यात आली आहे. या भागातील वाळू उपसा कधीही करण्यात आलेली नाही मात्र सध्या हे काम सुरु करण्यात आले असून हे काम बंद करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

सध्या सुरु असलेल्या कामाचे स्वरुप पाहता स्मार्ट सिटी आणि नाशिक महानगर पालिका यांनी संयुक्त रित्या याठिकाणाहून वाळू उपसा होणार नाही याकडे लक्ष द्यावे. संबंधित ठेकेदाराला खोदकाम, गाळ काढण्याचे पैसे देण्यात येत असून त्यातून गाळाऐवजी वाळू काढली जात असून त्यातून महानगर पालिकेचे नुकसान होत आहे.

त्यातच या वाळूची मालकी महानगरपालिकेची असून सध्या महसुल विभागाकडे रॉयल्अ भरली असली तरी यापुढे ही रॉयल्टी सुद्धा भरून घेवून नये आणि हे काम तातडीने थांबवावे अशी मागणी करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या