Saturday, April 27, 2024
Homeधुळेपीककर्ज मंजुरीसाठी दलालांचा सुळसुळाट थांबवा

पीककर्ज मंजुरीसाठी दलालांचा सुळसुळाट थांबवा

दोंडाईचा । वि.प्र. Dondaicha

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरातील युनियन बँक शाखेवर काल दुपारी मोर्चा नेण्यात आला. शेतकरी बांधवांना त्वरित पिक कर्ज उपलब्ध करून देण्यासह पिक कर्ज मंजूरीसाठी दलालांचा सुळसुळाट थांबवावा, अशी मागणी करण्यात आली.

- Advertisement -

पिक कर्ज संदर्भात एजंट अथवा दलालाची मध्यस्थी शिवाय पिक कर्ज उपलब्ध होत नसल्याची ओरड अनेक दिवसांपासून शेतकर्‍यांमधून होत होती. तसेच सर्च रिपोर्ट शिरपूर येथील वकीलाकडून उपलब्ध करावा लागतो. शिंदखेडा तालुक्यातील वकीलांकडुन सर्च रिपोर्ट तयार केल्यास शेतकर्‍यांचे श्रम आणि नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. पिक कर्जासाठी काही शेतकरी तर मार्चपासून बँकेच्या चकरा मारत आहेेत. मात्र अद्यापही पिक कर्ज उपलब्ध झाले नाही. उतारांवर बोजा चढवून झाल्यावरही अध्याप पावेतो पिक कर्ज उपलब्ध न झाल्याने दोंडाईचासह परिसरातील शेतकर्‍यांचा संताप अनावर झाला. यावेळी देगाव, वरझडी, अंजनविहिरे, सतारे, मेथी, कोळदे, लंघाने, बाम्हणे, धमाणेसह इतर गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अ‍ॅड. एकनाथ भावसार, जिल्हाध्यक्ष मयूर बोरसे, शिंदखेडा तालुकाध्यक्ष चिराग माळी, जिल्हा कार्याध्यक्ष कमलाकर बागले, ओबीसी सेलचे ईश्वर माळी, दादाभाई कापुरे, बापूजी मिस्तरी, संजोग राजपूत, भुषण पाटील, मयुर पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शाखा व्यवस्थापक चंचल तायडे यांनी शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरे जात पिक कर्ज संदर्भात करण्यात आलेल्या मागण्या त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी दलालांमार्फत त्वरित कर्ज उपलब्ध होत आहे. यासाठी टक्केवारी घेतली जात असल्याचा आरोप केला. एवढेच नव्हे तर काही शेतकर्‍यांच्या नावे बोजा चढविण्यात आला, तरी अद्याप त्यांना पिक कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले नाही, असे धक्कादायक प्रकार समोर आणले.

याबाबत शाखा व्यवस्थापक चंचल तायडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, माझ्यासह अन्य कर्मचारी आजारी होतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पन्नास टक्के कर्मचारी उपस्थिती आणि शेतकर्‍यांच्या कागदपत्रांची अपूर्णता यामुळे पिक कर्ज उपलब्ध करण्यास विलंब झाला. यापुढे त्वरीत कागदपत्रांची पूर्तता झाल्यास विनाविलंब पिक कर्ज उपलब्ध करुन दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या