Saturday, April 27, 2024
Homeधुळेसळई चोरणारी टोळी गजाआड, जंगलात पाठलाग करून पकडले

सळई चोरणारी टोळी गजाआड, जंगलात पाठलाग करून पकडले

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्ह्यातून लोखंडी सळ्या चोरी करणार्‍या गुजरात राज्यातील बारडोलीतील टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.

- Advertisement -

टोळीतील चौघांना साक्री तालुक्यातील दिघावे शिवारातील जंगताल पाठलाग करून पकडण्यात आले. त्यांच्याकडून ट्रकसह 4 हजार 500 किलो सळई असा एकुण 7 लाख 53 हजारांचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान मोहाडीतील दरोड्याचा बारा तासांच्या आतच एलसीबीकडून उलगडा करण्यात करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये साक्री तालुक्यातील साक्रीसह पिंपळनेर, दहिवेल परिसरातुन बांधकामासाठी आणलेल्या लोखंडी सळया चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते.

त्यामुळे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचार्‍यांना समांतर तपास करुन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना लोखंडी सळया चोरणारी टोळी ही बारडोली (गुजरात) येथे कार्यरत असून ती टोळी दि. 1 रोजी धुळे येथे आली असल्याची गुप्त माहिती मिळाली.

त्यानुसार मध्यरात्री एक संशयास्पद कार (क्र. जी जे -19 – ओ एम -8601) ही सुरत-बायपास रोडवरील भंडारा हॉटेल समोर उभी दिसली. तपासली केली असता त्यात रणजीत रामसिंग गामीत (रा. कनाडा पिंपळाखडी ता. सोनगड जि. तापी) हा मिळून आला.

चौकशीत त्याने त्याचे काही साथीदार हे मोहाडी पोलिस ठाणे हद्दीत राणमळा परिसरात लोखंडी सळया चोरण्यासाठी गेल्याचे सांगितले.

तपासात त्याचे साथीदार हे ट्रकमधुन सळयाभरुन त्या साक्री पिंपळनेर मार्गे बारडोली येथे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.ट्रकचा पाठलाग केला असता ती पिंपळनेर रोडवरुन मालपुर कासारेमार्गे छाईल व तेथुन दिघावेमार्गे पिंपळनेरकडे जात असल्याचे निदर्शनास आले.

त्यानुसार पथकाने पिंपळनेर सटाणा रोडने दिघावे गावाकडे सदर ट्रकचा शोध घेतला. ट्रक समोर दिसताच त्याला थांबण्याचा इशारा केला. ट्रक थांबवुन चालकासह बसलेल्या इसमांनी बाहेर उडया मारुन जंगला पळ काढला.

पथकानेही त्यांचा पाठलाग करुन कमलेश भरत हरपट्टी (वय 19 रा. सिंगुर ता बारडोली जि.सुरत), पठाण सुलतान खान युसूफखान (वय 30 रा. मढी ता. बारडोली जि.सुरत), विलासभाई संजुभाई फत्तु ( वय 28 रा झरणपाडा ता.उसल जि. तापी) व सुरेश कांतीलाल काथुड (वय 28 रा. झरणपाडा ता.उच्छल जि.तापी) यांना ताब्यात घेतले. त्याचे सोबतचे काही जण पसार झाले. ट्रकसह त्यांच्याकडील पाच मोबाईल, कार, व 4 हजार 500 किलो लोखंडी सळया असा एकुण 7 लाख 53 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

रानमळ्यातील गुन्हा उघड

धुळे तालुक्यातील रानमळा येथील शनेश्वर शिक्षण संस्था संचलीत, डी फार्मसी कॉलेज इमारतीचे बांधकामासाठी आणलेल्या लोखंडी सळया या तेथील वॉचमनला मारहाण करुन वरील संशयीत आरोपी हे जबरीने चोरी करुन घेऊन जात असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विविध ठिकाणी चोरीची कबुली

ताब्यात घेतलेल्या संशीयतांकडे विचारपुस केली असता त्यांनी साक्री, दहिवेल, पिंपळनेर व नेर येथे लोखंडी सळयांची चोरी केली असल्याचे कबुली दिली आहे. त्यांनी इतर जिल्हयातही सळयांची चोरी केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्या दृष्टीकोनातुन चौकशी सुरू आहे. चौघांना मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी मोहाडी पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कामगिरी

ही कामगिरी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि. शिवाजी बुधवंत, पोसई हनुमान ऊगले, पोहेकॉ विंचुरकर, संजय पाटील, संदिप थोरात, पोना पानपाटील, अशोक पाटील,पोकॉ विशाल पाटील, मयुर पाटील, उमेश पवार,किशोर पाटील, चेतन कंखरे, तुषार पारधी, विजय सोनवणे, श्रीशेल जाधव, विलास पाटील यांंनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या