Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रखतांची दरवाढ मागे न घेतल्यास राज्यव्यापी घंटानाद आंदोलन

खतांची दरवाढ मागे न घेतल्यास राज्यव्यापी घंटानाद आंदोलन

मुंबई । प्रतिनिधी

राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसने खरीप हंगामाच्या तोंडावर करण्यात आलेल्या खतांच्या दरवाढीवर आक्रमक पवित्रा घेतला आहे. खतांची दरवाढ दोन दिवसात मागे न घेतल्यास काँग्रेसच्यावतीने राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी येथे दिला.

- Advertisement -

करोनाच्या संकटाने शेतकरी पुरता पिचला गेला आहे. त्याला आधार देण्याऐवजी खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून त्यांच्यावर आणखी अन्याय केला आहे. तीन काळे कृषी कायदे आणून मोदी सरकारने शेतक-यांना बड्या उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचा विडा उचलला आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत केलेली दीडपट वाढ हे त्या दृष्टीनेच टाकलेले पाऊल आहे. दीडपट हमीभाव देण्याची घोषणा करणा-या मोदींनी हमीभावाऐवजी शेतक-यांना येणारा उत्पादन खर्च दीडपट वाढवला आहे,अशी टीका पटोले यांनी केली.

अशा वाढल्या खतांच्या किंमती

पेट्रोल-डिझेल, खाद्यतेलांच्या दरवाढीमुळे अगोदरच जनतेचे कंबरडे मोडले असताना रासायनिक खतांच्या दरवाढीचा बोजा शेतक-यांवर पडला आहे. १०.२६.२६ खताची किंमत ६०० रुपयांनी वाढली आहे तर डीएपीची किंमत ७१५ रूपयांनी, डिएफएच्या गोणीची किंमत आधी १ हजार १८५ रुपये होती ती आता १ हजार ९०० रुपये केली आहे. १०.२६.२६ च्या ५० किलोच्या पोत्याला १ हजार १७५ रुपयांऐवजी १ हजार ७७५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच पोटॅशच्या किंमतीही वाढवल्या आहेत, अशी माहिती पटोले यांनी दिली.

एका बाजूला शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा केल्याचा गाजावाजा करून दुस-या बाजूला खतांच्या किंमती वाढवून प्रत्यक्षात शेतक-यांची लूट करत पंतप्रधान नरेंद्र हे उद्योगपती मित्रांची घरे भरण्याचे काम करत आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या