राज्य पतसंस्था फेडरेशन निवडणुकीत 35 उमेदवारी अर्ज दाखल

jalgaon-digital
2 Min Read

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन या महाराष्ट्रातील 16000 नागरी सहकारी, पगारदार सहकारी व महिला सहकारी पतसंस्थांचे प्रतिनिधित्व करणार्‍या शिखर संस्थेची सन 2021-22 ते 2027-28 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण 65 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीनंतर 35 इतके अर्ज कायम राहिले असून महिलांसाठी राखीव, एन.टी. प्रवर्गासाठी राखीव व एस.सी. प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांमध्ये सहकार समृद्धी पॅनलचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

उर्वरित जागांसाठी सहकार समृद्धी पॅनलचे प्रमुख व विद्यमान अध्यक्ष काका कोयटे हे प्रमुख असलेल्या पॅनलचे 21 उमेदवार रिंगणात आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये महिलांसाठी राखीव गटातून नाशिक येथील कल्याणी महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा अंजली गोपाल पाटील, बारामतीच्या माजी नगरध्यक्षा भारती मुथा तसेच अनुसूचित जाती जमातीचे गटातून वसईचे शरद जाधव त्याचप्रमाणे अनुसूचित जमातीचे प्रवर्गातून राजुदास जाधव या 4 उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर होईल, असे चित्र स्पष्ट झाले आहे.

या उमदेवारांना सहकार भारतीचा देखील पाठींबा देण्याचा निर्णय सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी यांनी घेतला आहे. उर्वरित प्रमुख विरोधी उमदेवारांमध्ये ज्ञानदीप पतसंस्थेचे माजी अध्यक्ष जिजोबा पवार, अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सबाजीराव गायकवाड, पारनेर येथील बाजीराव पानमंद व अन्य उमेदवारांचा समावेश आहे.

बुधवार दि. 14 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार असून अर्ज माघारी घेण्याची मुदत बुधवार 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत आहे. महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांचे मतदान या निवडणुकीत असल्याने महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीचे या निवडणुकीकडे लक्ष लागलेले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *