‘स्थायी’ची कोविड प्रश्नावर 11ला बैठक

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिक शहरात करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असुन कोविड रुग्णांना अत्यावश्यक असलेला ऑक्सिजनचा अपूर्ण पुरवठा, व्हेंटिलेटरचा तुटवडा, रुग्णांकडुन अवाजवी बिल वसुली यासंदर्भात अनेक संदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी येत्या 11 सप्टेंबर रोजी महासभा सभागृहात स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचे आज (दि.8) महापलिका स्थायी सभापती गणेश गिते यांनी जाहीर केले.

महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात ऑक्सीजन व्हॅक्युम व एअर पाईपलाईन कामासंदर्भातील विषयावर चर्चेच्या दरम्यान करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडुन करण्यात येणार्‍या उपाय योजना, रुग्णांच्या बेडसंदर्भातील नियोजन, व ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड यासंदर्भातील प्रश्न सदस्यांनी उपस्थित करीत तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या.

या विषयाला सुधाकर बडगुजर यांनी तोंड फोडले. महापालिकेकडुन रुग्ण वाढत असतांना कोणतेही नियोजन झाले नसल्याचा आरोप करीत एका लाखासाठी एक व्हेटीलेटर अशी स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑक्सीजन उपबल्ध होत नसुन प्रत्येक रुग्णांला तो मिळेल यांची खात्री नाही. एका खासगी रुग्णालयाची 39 दिवसाची अर्थिक उलाढाल 46 कोटी रुपये झाली, याचा अर्थ रुग्णांची खासगी रुग्णांलयाकडुन लूट सुरू आहे.

यात महापालिकेचा वैद्यकिय विभाग सामील आहे, हा भ्रष्टाचार सुरु आहे. रुग्णांना बेड मिळत नाही, मग महापालिकेचे 30 टक्के बेड कुठे आहे ? असा उद्वीग्न सवाल बडगुजर यांनी उपस्थित केला.

त्यानंतर आरोग्य विभागात चालक असलेल्या आपल्या भावाला करोनाशी कसा सामना करावा लागला, याची माहिती सत्यभामा गाडेकर यांनी सर्वासमोर मांडत महापालिकेच्या कारभारावर बोट ठेवले.

कोविड झालेल्या महापालिकेच्या सेवकांना पुरेशा सेवा सुविधा पुरविल्या जात नसुन त्यांच्या खासगी रुग्णालयातील औषधोपचाराच्या खर्चाचे काय ? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

तसेच शरद मोरे यांनी देखील आरोग्य विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. डॉ. वर्षा भालेराव यांनी करोनासाठी आयुक्तांच्या अधिकारात आवश्यक साधन सामुग्री खरेदी करावी अशी मागणी करीत रुग्ण दुप्पट होण्याची शक्यता गृहीत धरुन अधिकार्‍यांनी नियोजन करावे असेही त्यांनी सांगितले.

अशाप्रकारे सदस्यांच्या संतापजनक भावना व कोविडसंदर्भातील उपाय योजनांतील गंभीर त्रुटी समोर आल्यानंतर येत्या 11 सप्टेंबर रोजी कोविड विषयावर चर्चा करण्यासाठी स्थायीची सभागृहात विशेष सभा घेण्याचे सभापती गिते यांनी जाहीर केले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *