Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यारखडलेले प्रकल्प : राजे संभाजी स्टेडियमचे काम बंद

रखडलेले प्रकल्प : राजे संभाजी स्टेडियमचे काम बंद

नाशिक । निशिकांत पाटील Nashik

छत्रपती राजे संभाजी स्टेडियमच्या (Chhatrapati Raje Sambhaji Stadium) विस्तारासाठी तब्बल 20 वर्षांनंतर खेलो इंडिया खेलो योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून सहा कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र येथील काम सुरू झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच बंद पडल्याने व्यायामप्रेमींसह मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकसाठी येणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे.

- Advertisement -

राजे संभाजी स्टेडियमच्या विस्तारीकरणासाठी खा. हेमंत गोडसे ( MP Hemant Godse ) यांनी केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया खेलो’ योजनेअंतर्गत ( Khelo India Khelo Campaign )निधी आणला व मोठ्या दिमाखात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सदर प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.

प्रत्यक्षात या ठिकाणी काम सुरू झाले. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच येथील काम बंद पडले. दरम्यान, करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षे येथील काम बंदच होते. त्यातच सदर काम करत असलेल्या ठेकेदाराची तब्बेत बिघडल्याने कामाचा पाठपुरावा नक्की कुणाकडे करावा, असा प्रश्न येथील नागरिकांना भेडसावत आहे. सध्या या ठिकाणी मातीचे ढीग पडून आहेत.

यासोबतच जॉगिंग ट्रॅकशेजारीच अर्धवट अवस्थेत केलेल्या कामामुळे राजे संभाजी स्टेडियमला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. या स्टेडियमवर सकाळी 4 वाजेपासून व्यायामप्रेमींसह ज्येष्ठ नागरिकांची गर्दी जमलेली असते. अशातच नवीन सुरू केलेले काम बंद अवस्थेत असल्याने पूर्वीचेच स्टेडियम काय वाईट होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नासाठी आता नेमकी दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

विस्तारीकरण ठप्प

नवीन विस्तारीकरण होणार्‍या क्रीडांगणामध्ये बास्केट बॉल, लॉन टेनिस, स्पोर्टस् अ‍ॅकेडमी अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटर, होस्टेल इमारत, अत्याधुनिक लायब्ररी, एक्सेसेटिंग सीटिंग गॅलरी, अत्याधुनिक व्हीआयपी गॅलरी व उपाहारगृह या सुविधा होणार होत्या. ती कामेही आता ठप्प झाली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या