शेवगावला एसटी कर्मचारी आंदोलनास आमदार राजळे यांचा पाठिंबा

jalgaon-digital
2 Min Read

शेवगाव |शहर प्रतिनिधि| Shevgav

शेवगाव येथे सुरू असलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनास पाथर्डी – शेवगावच्या भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी सशर्त पाठिंबा दिला आहे. दरम्यान कर्मचारी कृती समितीच्यावतीने शुक्रवारी (दि.12) तहसीलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात येऊन एसटी कर्मचा-यांना शासकीय कर्मचार्‍याचा दर्जा, अधिकार व वेतन श्रेणी मिळावी या प्रमुख मागणीच्या पाठपुराव्यासाठी जिल्ह्यासह राज्यातील अनेक आगारांतील कर्मचार्‍यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले असून या आंदोलनात शेवगाव आगारातील कर्मचारी रविवारी मध्यरात्रीपासून सहभागी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेवगाव – पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी शेवगाव येथे एसटी कर्मचार्‍यांची भेट घेऊन आंदोलनास सशर्त पाठिंबा जाहीर केला.

एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य करून त्यांना दिलासा मिळावा याबाबत परिवहन मंत्री यांच्यासह सर्व संबंधितांचे लक्ष वेधण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. पाथर्डी तालुक्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, शेवगाव येथील ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक आहुजा, कमलेश गांधी, सुनील रासने, संजय खेडकर यांच्यासह समर्थक कार्यकर्ते व आगारातील कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान शेवगाव आगारातील एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्यावतीने आज शुक्रवारी (दि.12) रोजी शेवगाव तहसील कार्यालयावर धडक मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शेवगाव आगारातील चालक दिलीप हरिभाऊ काकडे यांनीही गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या पार्श्वभूमीवर येथील कर्मचारी आक्रमक आहेत. या मूक मोर्चात एसटी कर्मचार्‍यांबाबत सहानुभूती असलेल्या विविध राजकीय पक्ष व सामाजिक संस्था संघटनांच्या पदाधिकारी सदस्यांनी सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

यांनी दिला पाठिंबा

आंदोलनास जि.प. सदस्या हर्षदा काकडे, जि.प. च्या कृषी समितीचे माजी सभापती दिलीपराव लांडे, सेवानिवृत्त एसटी कर्मचारी संघटनेचे रामराव वाघ, राजाभाऊ पांडव, शेषराव फलके, विजय जगदाळे, तसेच नॅशनल अँटीकरप्शन क्राईम कंट्रोल ब्युरो संघटनेचे अस्लम शेख, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा .किसन चव्हाण, कॉ.संजय नांगरे आदींनी आगारातील एसटी कर्मचार्‍यांची भेट घेऊन आपला पाठींबा जाहीर केला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *