Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरएसटी चालक-वाहकाचा प्रामाणिकपणा

एसटी चालक-वाहकाचा प्रामाणिकपणा

लोणी | वार्ताहर

कलियुगातही काही प्रामाणिक लोक असल्याची उदाहरणे समोर येत आहेत. लोणीच्या एका विद्यार्थ्यांची एसटी बसमध्ये शैक्षणीक कागदपत्र असलेली बॅग विसरली. पण नाशिकपर्यंत प्रवास करूनही चालक-वाचकांच्या प्रमाणिकपणामुळे ती बारा तासात परत मिळाल्याने या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान टळले.

- Advertisement -

लोणी बुद्रुक येथील महेश खंडेराव विखे हा विद्यार्थी पुण्याहुन नगर मार्गे लोणीला आपल्या घरी येत होता. त्याला नगरहून बस बदलावी लागली. मात्र त्याच्याकडे दोन सामानाच्या बॅग आणि एक पाठीवरची शैक्षणिक कागदपत्रांची बॅग होती. कोल्हारपर्यंत तो उभा राहून आला परंतु तेथून पुढे जागा मिळाल्याने त्याने पाठीवरची बॅग वरती लगेच रॅक मध्ये ठेवली.

लोणीत पोहचल्यावर तो खाली ठेवलेल्या दोन बॅग घेऊन उतरला आणि घरी गेला. एक महत्वाची बॅग तो बस मध्येच विसरला. तीन तास उलटल्यावर त्याला आठवण झाली. त्याला कोणत्या एसटी बसने प्रवास केला हेही माहीत नव्हते. नुकतीच अभियांत्रिकी पदवी मिळवलेल्या महेशला हरवलेली कागदपत्र पुन्हा मिळवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागणार आहेत याची जाणीव झाली होती.तो खूप तणावाखाली होता.

परंतु लोणीचे बस नियंत्रक कोबरणे यांची भेट घेऊन त्यांना विषयाचे गांभीर्य सांगितले. त्यांनी वेळ विचारून लगेच तुळजापूर-नाशिक बस असल्याचे सांगितले. महेश यांचे मामा गणेश गाडे हे श्रीरामपूर येथील एसटी कार्यशाळेत नोकरीत आहेत. त्यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी नाशिक येथून वाहक-चालक यांच्याशी संपर्क केला. त्यांनी एक बॅग बसमध्ये मिळाल्याचे सांगितले.

उद्या सकाळी हीच बस तुळजापूरकडे लोणीतून जाणार असल्याने आम्ही बॅग घेऊन येतो म्हणून सांगितले. महेश विखे हा बीई सिव्हिल इंजिनियर असून त्याचे दहावी, बारावी आणि इंजिनियरिंगची गुणपत्रके व इतर कागदपत्र त्या बॅग मध्ये होते. शिवाय पन्नास हजार किमतीचा लॅपटॉपही होता. बसचे वाहक नेताजी मुळे आणि चालक बाळासाहेब सोनवणे हे लोणीत येताच त्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल विखे कुटुंबीयांनी त्यांचा सत्कार करून आभार मानले.

काही दिवसांपूर्वी याच बसमध्ये एकदा तीस हजाराची रक्कम आणि एकदा सोन्याच्या दागिन्यांची पर्स मिळाली होती. मुळे-सोनवणे जोडीने त्याचे मालक शोधून त्यांना ते परत केले होते. आजही प्रामाणिक, नितीवान लोक समाजात आहेत म्हणून समाजात परस्पर विश्वासाचे वातावरण टिकून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या