Saturday, April 27, 2024
Homeनगरतालुक्यासाठी थेट बससेवा नसल्यामुळे पुणतांबेकर त्रस्त

तालुक्यासाठी थेट बससेवा नसल्यामुळे पुणतांबेकर त्रस्त

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

राहाता तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वात मोठ्या समजल्या जाणार्‍या पुणतांबा गावातील ग्रामस्थांना तहसील कचेरीतील कामे करण्यासाठी राहाता येथे जाण्यासाठी थेट बससेवा नसल्यामुळे पुणतांबा येथील शेतकरी ग्रामस्थ तसेच विद्यार्थी वर्गाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

- Advertisement -

26 जून 1999 मध्ये राहाता तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर पुणतांबा गावाचा समावेश राहाता तालुक्यात करण्यात आला होता. त्यामुळे महसूलशी निगडीत बहुतेक कामे करण्यासाठी सातत्याने राहात्याला जावे लागते. मात्र पुणतांबा ते राहाता अशी थेट बससेवा नसल्यामुळे ग्रामस्थांना शिर्डीहून राहात्याला किंवा श्रीरामपूरहून खैरी निमगाव किंवा गणेशनगर मार्गे राहात्याला जावे लागते. मात्र हे मार्ग जास्त अंतराचे असून यात वेळ व पैशाचा अपव्यय होतो. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी 23 वर्षापासून थेट बससेवा नसल्याचे हे महाराष्ट्रातील दुर्मिळ उदाहरण असेल असे ग्रामस्थाचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे ज्या ग्रामस्थांना राहात्याला जाणे शक्य नसते ते गावात समाजसेवेच्या नावाखाली काही जणांकडे आपली कामे सोपवतात. मात्र काही ग्रामस्थांना वेगळा अनुभव येत असल्यामुळे अनेकांनी प्रत्यक्ष जाण्यास प्राधान्य दिले आहे. पुणतांबा परिसराची लोकसंख्या 35 हजाराच्या पुढे आहे निदान ग्रामस्थ विद्यार्थी शेतकरी वर्ग यांच्या हिताचा विचार करून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील लोकप्रतिनिधी ना. आशुतोष काळे यांनी पुणतांबा-राहाता बससेवा सुरु करावी. या बससेवेची सकाळी एक फेरी व सायकांळच्या वेळेस एक फेरी ठेवली तरी सर्वांचीच चांगली सोय होऊ शकेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या