Wednesday, May 8, 2024
Homeक्रीडाआयपीएलमध्ये आज रंगणार दोन धमाकेदार सामने

आयपीएलमध्ये आज रंगणार दोन धमाकेदार सामने

मुंबई | Mumbai

आयपीएलमध्ये (IPL) आज रविवारी दोन धमाकेदार सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी ३:३० वाजता सनरायझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात डीवाय पाटील मैदानावर होणार आहे….

- Advertisement -

पंजाब किंग्ज संघाने गत सामन्यात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पराभूत केले होते. आता हैद्राबादला (SRH) पराभवाची धूळ चारून विजयी चौकार मारण्यासाठी पंजाब किंग्ज (PBKS) सज्ज आहे. तर दुसरीकडे सलामीचे २ सामने गमावून संथ सुरुवातीनंतर हैद्राबाद संघाने कोलकाता नाईट रायडर्स (KKR), चेन्नई सुपरकिंग्ज (CSK), गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध विजय नोंदवले आहेत.

आता पंजाबला पराभूत करून सलग ४ था विजय नोंदवण्यासाठी हैद्राबाद सज्ज आहे. पंजाब आणि हैद्राबाद आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण १८ सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. यात हैद्राबाद संघाचे पारडं जड राहिले आहे. हैद्राबादने १२ तर पंजाब किंग्जने ६ विजय नोंदवले आहेत .

यंदाच्या हंगामात पंजाबचा संघ शानदार लयीत आहे. हैद्राबादला योग्य वेळी लय गवसली आहे. त्याचबरोबर हैद्राबाद आणि पंजाब यांच्यातील मागील ५ सामन्यांच्या निकालावर नजर टाकल्यास यातही हैद्राबादचा संघ पंजाबवर वरचढ ठरला आहे. हैद्राबादने ३ तर पंजाबने २ सामन्यांमध्ये विजय साकारला आहे.

आयपीएलमध्ये (IPL) आज रविवारी दुसरा सामना पुण्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे. यंदाच्या हंगामात सलग ४ सामन्यांमध्ये पराभूत झालेल्या चेन्नईची गाडी अखेर रुळावर आली आहे.

आता गुजरातवर विजय मिळवून स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवण्यासाठी चेन्नई सज्ज असणार आहे. आरसीबीविरुद्ध (RCB) मिळालेल्या विजयामुळे चेन्नईचा आत्मविश्वास दुणावला आहे. तर यंदाच्या हंगामात ६ सामन्यांमध्ये ४ विजय आणि २ पराभवांसह ८ गुणांनी गुजरात अव्वल स्थानावर आहे.

चेन्नईवर मात करून आपले अव्वल स्थान अधिक मजबूत करण्यासाठी गुजरात टायटन्स सज्ज आहे. हा सामना म्हणजे चेन्नईची फलंदाजी विरुद्ध गुजरातची धारदार गोलंदाजी असा दुहेरी रंगण्याची शक्यता आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या