Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्याPM मोदींनी संसदेत दिला जुन्या आठवणींना उजाळा; पंडित नेहरु, इंदिरा गांधी अन्...

PM मोदींनी संसदेत दिला जुन्या आठवणींना उजाळा; पंडित नेहरु, इंदिरा गांधी अन् राजीव गांधींचा विशेष उल्लेख

दिल्ली | Delhi

आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. तर उद्यापासून नव्या संसद भवनात कामकाज सुरु होणार आहे. त्याआधी लोकसभे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारत जी २० परिषदेमुळे कसा जगभरात चर्चिला गेला हे सांगितलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण करत सध्याच्या संसद सभागृहाबद्दल अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी भाषणात पंतप्रधान मोदींनी पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचा विशेष उल्लेख केला.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी म्हणाले, जुन्या संसद भवनात संघर्ष आणि उत्सवाचे वातावरण अनुभवले. जुन्या संसदेत अनेक गोड आणि कडू आठवणी आहेत. जुन्या संसदेतून बाहेर पडणे हा भावनिक क्षण आहे. आपण ऐतिहासिक संसद भवनातून निरोप घेतोय. पण, जुने संसद भवन येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल. भारताचे संसद भवन उभारण्याचे निर्णय ब्रिटीश शासनाचा होता. संसद भवन उभारण्यासाठी पैसे आणि मेहनत भारतीयांची होती, असे पंतप्रधान मोदींनी संसदेत बोलताना म्हटले. मी पहिल्यांदा खासदार झाल्यावर संसद भवनाच्या पायऱ्यांवर डोके टेकवून लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश केला. रेल्वे प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या गरीबाचा मुलगा संसदेत पोहचला हीच भारताच्या लोकशाहीची ताकद आहे. देश मला एवढा आशीर्वाद आणि माझ्यावर इतके प्रेम करेल, यांची कल्पना देखील करू शकत नाही, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

मागच्या ७५ वर्षांच्या कालावधीत अनेक लोकशाही प्रक्रिया आपण या सदनात पाहिल्या. ही वास्तू अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. आपण आता नव्या संसदेत कामकाज सुरु करणार आहोत. मात्र हे संसद भवन येणाऱ्या पिढ्यांना इतिहास सांगत राहणार आहे. भारताच्या इतिहासाचा सुवर्ण अध्याय काय होता त्याची ओळख जगाला केली जाणार आहे. अमृतकाळात आपण आता नवी स्वप्नं, नवी उर्जा, नव्या संकल्पना घेऊन पुढे जात आहोत. आज जगात भारताची चर्चा होते आणि आपल्याला त्याचा गौरव आहे. आपल्या ७५ वर्षीय संसदीय इतिहासाचा हा सामूहिक परिणाम आहे. त्यामुळेच भारताचा डंका जगात वाजतो आहे. असेही ते म्हणाले.

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, पंडित नेहरू यांची प्रारंभिक मंत्रिपरिषद होती. बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री होते. जगातील सर्वोत्तम संविधान निर्माण करण्यासाठी त्यांनी पाऊल उचलले. नेहरूंच्या कारकिर्दीत वॉटर पॉलिसी बनवण्यासाठी योगदान दिले. बाबासाहेबांनी सामाजिक न्यायासाठी सातत्याने प्रयत्न केले. लाल बहादुर शास्त्री यांनी १९६५ च्या युद्धात जवानांचे मनोबल याच सभागृहातून वाढवले होते. हरितक्रांतीसाठी याच सभागृहातून पहिले पाऊल उचलले. याच सभागृहात ग्रामीण विकास मंत्रालयाची स्थापना केली गेली. याच सभागृहात मतदानाचे वय १८ करण्यात आले. पंडित नेहरू, शास्त्री यांच्यापासून अटल बिहारी आणि मनमोहन सिंह यांच्यापर्यंत सर्वांनी देशाला नवीन दिशा दिली असं त्यांनी सांगितले. तसेच आज सर्वांचे कौतुक करण्याची वेळ आहे. सर्वांनी या सभागृहाला समृद्ध करण्यासाठी आणि देशातील सामान्य नागरिकांचा आवाज उठवण्याचे काम केले. राजीव गांधी, इंदिरा गांधी यांना देशाने गमावले तेव्हा साश्रूनयनांनी श्रद्धांजली देताना याच सभागृहाने पाहिले. भारताच्या लोकशाहीत अनेक चढउतार पाहिले. हे सभागृह लोकशाहीची ताकद आहे. लोकशाहीचे केंद्रबिंदू हे सभागृह आहे. एका मताने याच सभागृहात सरकार कोसळले होते असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

चांद्रयान ३ चं जे यश आपल्या देशाला मिळालं, त्यामुळे भारताच्या सामर्थ्याचं आधुनिकता, तंत्रज्ञानाशी आणि वैज्ञानिकांच्या सामर्थ्यांशी जोडलेलं नवं रुप जगासमोर आलं आहे. याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. मी आज देशातल्या संशोधकांचे कोटी कोटी धन्यवाद देतो आणि चांद्रयान ३ साठी त्यांचं अभिनंदन करतो असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. जी २० ला आपल्या देशात यश मिळालं. त्यामुळे देशाचा गौरव वाढला. १४० कोटी भारतीयांचं हे यश आहे, हे माझं किंवा पक्षाचं यश नाही. भारतात ६० ठिकाणी जी २० परिषद पार पडली, देशातल्या राज्यातील विविध सरकारांनी ही परिषद घेतली ही बाब गौरवास्पाद आहे. भारताकडे जेव्हा या परिषदेचं अध्यक्षपद असताना अफ्रिकन युनियन सदस्य झाला. मी तो भावनिक क्षण कधीही विसरु शकत नाही. किती मोठ्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आपल्या भाग्यात लिहिला गेला आहे ही बाबही अभिमानास्पद आहे असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या