Wednesday, April 24, 2024
Homeब्लॉगधरतीचं दान

धरतीचं दान

भर उन्हात आपल्याच तळपण्याने अंगाची लाही-लाही करून घेणारा सूर्य त्याच्या या प्रखर किरणांची तप्त ज्वाला आपल्या कुशीत सामावून घेणारी ही धरतीची माती भरदुपारी आपल्यामध्ये अत्यंत शांतपणे ती सूर्याची किरणे निमुटपणे त्यांची गरमी सोसत होती.

धरतीच्या मातीचा सृजनतेशी अगदी जवळचा संबंध असल्यामुळेही या कसोटीतून तर जात नाही ना? प्रश्न सतत मनाला भेडसावत होता. जसजसा प्रहर ओसरत होता तसतशी ती या सूर्यकिरणांमध्ये न्हाऊन निघत आहे, असाच भास व्हायचा.

- Advertisement -

मग अगदी अल्लड वार्‍याची झुळूक येऊन मातीच्या सानिध्यातून तरंगत पुढे जायची. आपल्या सोबत ती त्या मनाला भुरळ पाडणारा मृद्गंध सोबत न्यायची. तो सुवास संबंध वातावरणात भरून राहायचा.

मनाला एक वेगळ्या जाणीव निर्माण करून त्यातून होत असे. दूर-दूर पसरलेला सुवास अगदी आसमंतात आपल्या अस्तित्वाची प्रेरक उत्कंठता निर्माण करायचा. कदाचित तो संबंध वातावरणाला सृजनतेची अबाधित वेळ जवळ येत आहे, असाच संदेश देत असल्याचे वाटायला लागले.

शेतकरी राजानेही आपली संपूर्ण मेहनत झोकून देत मातीला नव्या नवरीप्रमाणे सजवून ठेवले होते. तोही आता आपल्या स्वप्न रंगवत होता. ज्या दिवसाची संबंध सृष्टी अगदी आतुरतेने वाट पाहत होती, तो दिवस उजाडला आणि मृग नक्षत्रास सुरुवात झाली. धरतीवर पावसाच्या सरी धो-धो कोसळल्या.

मातीच्या कणाकणात मीलनाचे तांडवनृत्य सुरू झाले होते अन् त्या मातीचा मनाला भारावून सोडणारा सुगंध पुन्हा त्या पाऊसधारा आकाशात पोहचवत होत्या. पावसाने मातीतील सगळी उष्णता शीतल सरींनी शांत केली.

प्रत्येकाच्या चेहर्‍यावर आनंदाची लहर पसरली. कित्येक दिवसापासून तहानल्याने व्याकूळ झालेली झाडे; त्यांच्यात नवचैतन्याची चाहूल लागायला सुरुवात झाली. पक्ष्यांनी आनंद उत्सव साजरा करावा तशी अनुभूती त्यांच्या किलबिलाटातून येत होती.

सर्वत्र आनंदमय वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर आनंद खुलून दिसत होता. शेतकर्‍यांनी धरतीच्या कुशीत मोत्याच्या दाण्यांची तिला बहाल केली. मग सुरुवात झाली नव्या लयबध्द सृजनतेच्या प्रक्रियेला! तिच्या कुशीमधून अंकुर फुलू लागले. सरीवर सरी बरसवत पाऊसही धरतीला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता. त्याच्या क्षेत्रछायेत रूजलेले, अंकुरलेले ते बीज मोठे-मोठे होत होते.

आता त्या बीजांचे लहान-लहान रोपांत रूपांतर झाले होते. वार्‍याच्या तालावर ती रोपे डुलत होती. त्यांच्याभोवती घिरट्या घालायची वाट पाहत होते. त्यांच्या परिपूर्णतेची हळूहळू ही निसर्गदत्त प्रकिया पूर्ण होत होती.

सर्वत्र धरतीने हिरवा शालू पांघरला आहे, असेच जाणवत होते. आता ती रोपे मोठी झाली होती. त्यांच्यात आता भारदस्तपणा आला होता. त्यांची वाढ आता पूर्ण होत होती. पक्ष्यांचे थवे त्यांच्याकडे आकर्षित होत होते. पिकांच्या कणसांतील दाणे टिपण्यासाठी पक्षी सतत आसुसलेले असायचे. येथे कसरत चालायची शेतकर्‍याची; आपल्या शेतात आलेले मोत्याचे पीक वाचवण्यांची! कारण पक्षी टपलेले राहायचे.

मग शेतात उभे करावे लागायचे ते बुजगावणे, पक्ष्यांना हुलकावणी देण्यासाठी! बुजगावण्याला पाहून पक्षी आकाशातच घिरट्या घालायचे आणि घाबरायचे त्याला! एक अनामिक भीती त्यांना वाटायची. बुजगावण्याकडे पाहिल्यावर ते दिसायचेही तसेच वाटण्याजोगे! मग पक्ष्यांचे थवे आपला काफिला वळवायचे दुसरीकडे, पण प्रत्येक ठिकाणी त्यांना जाणवायचा बुजगावण्याचा सारखेपणा! त्यामुळे त्यांच्याही लक्षात यायचे की, फक्त आपल्याला हुलकावणी देण्यासाठी उभे केलेले पुतळे आहेत.

मग न घाबरता तेही बिलगायचे त्या मोठ्या झालेल्या परिपक्व रोपट्यांना आणि आपल्या मर्जीप्रमाणे चिमुकल्या चोचीने ते दाणे टिपत. जोपर्यंत कोणी त्यांना देत नाही तोपर्यंत हे सर्व चालायचे. काही चोचीतून पडलेले दाणे असायचे खाली पडलेले जमिनीवर. तेही पूर्णपणे नाही तर काही प्रमाणात पक्व झालेले. रूचकर दाण्यांची चव त्या पाखरांना लागली होती. त्यामुळे ती पाखरे दिवस उजाडताच आपल्या सवंगड्यांसह सतत यायची दररोज त्या ठरलेल्या शेतावर! शेतकर्‍याचीही तारांबळ उडायची.

तो राखण करायचा आपल्या डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवायचा पक्ष्यांच्या थव्यावर अन् उडवायचा गोफण पक्ष्यांच्या थव्याला उडवायला. आता पक्ष्यांचेही चालायचे नाही त्याच्यापुढे काही. कारण कित्येक पक्षी जायबंदी झाले होते त्या गोफणीच्या दगडांनी. काहींना तर प्राणसुध्दा गमवावा लागला होता. त्यामुळेच त्यांच्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली होती त्या गोफनीबद्दल! आता त्यांची हिंमत होत त्या शेतावर उतरण्यांची आणि दाणे टिपण्याची.

कारण आपल्या पिकावर राखण आता बुजगावणे नाही तर शेतकरी स्वतं:च करीत असे. ही प्रक्रिया चालायची काही काळ आणि पीक पूर्णपणे परिपक्व व्हायचे. आता पीक कापणीवर आले होते. पीक कापल्यावर त्या पिकाचे, कणसाचे, लागलेल्या झोताची मळणी झाल्यावर डोळ्यांत न मावणारी मोत्याची रास समोर दिसायची.

मोजकी दाण्यांची रास धरतीच्या कुशीत रूजवली होती. आता तेच दाणे कितीतरी पटीने समोर दिसत आहेत. म्हणजे सृष्टीत चाललेली सर्व प्रक्रिया, पक्ष्यांनी खाल्लेले दाणे सोडले तरीसुध्दा मोठ्या प्रमाणात धरतीने आपल्याला दान दिले. संपूर्ण मानवजातीचे जीवन समृध्द केले. सृजनाचा नवलगतीने चालणारा हा आविष्कार! जो याचा भागीदार असतो तोच खराखुरा भाग्यवंत असतो. नाही मिळत हे धरतीचे दान!

– बबलू कराळे,

(लेखक दर्यापूर, जिल्हा अमरावती येथे शिक्षक आहेत. मो.7218029838)

- Advertisment -

ताज्या बातम्या