Thursday, April 25, 2024
Homeनगरसभापती डॉ. वंदना मुरकुटे यांच्यामुळे करोना एकल महिलेस मिळणार निवारा

सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांच्यामुळे करोना एकल महिलेस मिळणार निवारा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोनामुळे पती गमावल्यानंतर बेसहारा झालेल्या उंबरगाव (ता. श्रीरामपूर) येथील कविता अशोक परभणे या करोना एकल महिलेस पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांच्यामुळे हक्काचा निवारा मिळणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य करोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वयक तसेच तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील मिशन वात्सल्य तालुका समितीचे अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवे व बाळासाहेब जपे यांनी शुक्रवारी करोना एकल महिलांच्या अडचणी, प्रश्न समजावून घेण्यासाठी कविता परभणे यांच्या घरी भेट दिली. तेव्हा त्यांचे पती अशोक परभणे यांच्या नावाने पंचायत समितीमार्फत चार वर्षांपूर्वी घरकुल मंजूर झाले होते. त्यानुसार घर बांधण्यासाठी 15 हजार रुपये अनुदानाचा पहिला हप्ता मिळाला होता. घर बांधायला खडी, वाळूही येऊन पडले होते. परंतु एका तक्रारीमुळे बांधकाम व अनुदान दोन्ही थांबविण्यात आले. तक्रारीची शहानिशा न करताच बांधकाम थांबविण्यात आल्याचे यावेळी निदर्शनास आले.

साळवे यांनी याबाबतची माहिती पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांना देत परभणे यांचे घरकुल पुन्हा मिळवून देण्याची विनंती केली. अशोक साखर कारखाना निवडणुकीनंतर डॉ. मुरकुटे आभार दौर्‍यात भेर्डापूर येथे होत्या. यावेळी त्या उंबरगाव येथे आल्या. यावेळी साळवे यांनी कागदपत्र, पुराव्यानिशी सभापतींना प्रकरण समजावून सांगितले. त्यांनी स्थानिक ग्रामसेवक ढाकणे, सरपंच चिमाजी राऊत, पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता आकाश शिंदे यांना जागेवर बोलावून घेतले. त्यांनाही परिस्थिती समजावून सांगत तात्काळ घरकुलाचे थांबलेले बांधकाम सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ग्रामसेवक व इतरांनी उद्यापासून बांधकाम सुरू करण्यास सांगितले. घरकुलाचा रखडलेला प्रश्न मार्गी लागल्याने कविता मरभणे यांनी सभापती मुरकुटे, साळवे, जपे यांना धन्यवाद दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या