Saturday, April 27, 2024
Homeनगरसोयाबीन, सुर्यफूल व भुईमुगावर केसाळ अळींचा प्रादुर्भाव

सोयाबीन, सुर्यफूल व भुईमुगावर केसाळ अळींचा प्रादुर्भाव

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोयाबीन, सुर्यफूल, भुईमूग पिकांवर केसाळ अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे.

- Advertisement -

वनस्पती, पिकांची पाने खाणारी ही अळी आहे. या अळीच्या विविध प्रजाती आढळतात. प्रामुख्याने सोयाबीन व सुर्यफुलावर स्पिलोसोमा ऑब्लिकव्या तर भुईमुगावर अमुस्काटा अल्बिस, ट्रायगा या प्रजाती आढळतात. या अळ्या पानातील हरितद्रव्य खातात व त्यामुळे पाने जाळीदार होतात. पिकांची योग्य वाढ होत नाही.

सोयाबीन पिकावर साधारणपणे ज्या केसाळ अळ्या आढळतात, त्यांचा रंग लहान असताना मळकट पिवळा तर त्या मोठ्या झाल्यावर भुरकट-लाल असा होतो. यां किडीचे जीवनचक्र अंडी, पतंग, अळी, कोष असेच राहते.

या किटकाची मादी ही पानाच्या खालच्या बाजूस साधारण 415 ते 1240 एवढी अंडी घालते. या अळीच्या शरीराची दोन्ही टोके सहसा काळी असतात. या अळ्या पानाच्या मागील बाजूस राहतात.

सूर्यफुलावर आढळणार्‍या अळीस ‘बिहार केसाळ’ अळी असेही म्हणतात. याचे पतंग हे मध्यम आकाराचे व दिसण्यास आकर्षक असे असतात. या अळीचा रंग पिवळसर, फिकट पिवळसर अथवा गुलाबी असतो.

नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्न करावेत. जमिनीची खोल नांगरट करावी, दर्प सापळ्यांचा वापर करावा. शेतकडेला चर खोदावेत. अंतर पीक पद्धतीचा अवलंब करावा. अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. जैविक उपाय- बी. टी. 1 किलो प्रति हेक्टर रासायनिक उपाय- फोसेलोन 35 ईसी 2 मिली किंवा ट्रायझोफॉस 1.6 मिली किंवा क्विनालफॉस 2 मिली किंवा लाबडासाय हॅलोथ्रीन 0.6 मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

– माणिक लाखे, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव-ने

- Advertisment -

ताज्या बातम्या