Friday, April 26, 2024
Homeनगरसोयाबीन जळाल्याने शेतकरी संकटात

सोयाबीन जळाल्याने शेतकरी संकटात

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तीन महिन्यांत कधी कधी पडलेला रिमझिम पाऊस व उपलब्ध असणारे जेमतेम पाणी देऊन तग धरून ठेवलेली सोयाबीन पिके आता डोळ्यादेखत जळून खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे शासनाने अशा नुकसानग्रस्त पिकांची तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून जोर धरू लागली.

- Advertisement -

चालू वर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत खरिपातील सोयाबीन, मका, कपाशी यासह चारा पिके जगतील एवढाही पाऊस झालेला नाही. त्यामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती भेडसावत आहे. जुलै महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या थोड्याशा पावसावर शेतकर्‍यांनी कपाशी, सोयाबीनची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने उघड दिल्याने पिकांनी माना टाकायला सुरूवात केली. अशावेळी शेतकर्‍यांनी जेमतेम उपलब्ध पाण्यावर तुषार सिंचनाचा आधार घेत ही पिके जगवून धरली. मात्र सध्या पाणी टंचाई जाणवत आहे.

त्या पाण्यावर शेतकरी पशुधनासाठी नियोजन करून ठेवलेली चारा पिके जगविताना दिसत आहे. खरिपातील पिकांवर शेतकर्‍यांचा मोठा खर्च झालेला आहे. मात्र पिके जळून गेल्याने झालेला खर्चही निघणार नाही, अशीच काही परिस्थिती आहे. दरम्यान, चालू वर्षी शासनाने 1 रुपयात पिकविमा भरवून घेतला. त्यामुळे पिकविमा कंपनीने शेतकर्‍यांना तातडीने 25 टक्के अग्रीम रक्कम द्यावी, अशी मागणी तालुक्यातील मातापूर येथील प्रगतिशील शेतकरी भगिरथ सुभाष उंडे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या