Thursday, April 25, 2024
Homeनगरबेलपिंपळगाव येथे शेतातील खोलीतून सोयाबीन व कापसाची चोरी

बेलपिंपळगाव येथे शेतातील खोलीतून सोयाबीन व कापसाची चोरी

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

शेतातील खोलीत ठेवलेली 100 किलो सोयाबीन व 70 किलो कापूस असा जवळपास 11 हजार रुपयांचा माल चोरीस गेल्याची फिर्याद बेलपिंपळगाव येथील शेतकर्‍याने दिली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात दोघांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अशोक भाऊराव गटकळ (वय 60) धंदा-शेती रा.बेलपिंपळगाव ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी सध्या आमच्या गावातील प्रितम परसराम तागड यांची शेतजमीन बटाईने करत आहे. 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी मी आमच्या वाट्याच्या शेतातील सोयाबीनच्या 8 गोण्या व वेचलेला कापूस हे शेतातील घरात (खोलीत) भरून ठेवले व कुलूप लावून घरी गेलो होतो. त्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी सकाळी शेतात गेलो असता खोलीचे कुलूप तोडलेले दिसले.

पाहणी केली असता दोन सोयाबीनच्या गोण्या व अंदाजे 70 किलो कापूस खोलीतून चोरीस गेलेले दिसले. झालेला प्रकार शेताचे मालक प्रितम तागड यांना कळवला असता मी बाहेरगावी असल्याने सुट्टी मिळाल्यावर तक्रार देण्यास येतो. परंतु ते न आल्याने मी तक्रार देण्यास आलो. आमच्या शेजारील वसंत खंडेराव तागड व त्यांच्यासोबतचे इतर एकजण असे दोघांनी 5 हजार 300 रुपये किंमतीची 100 किलो सोयाबीन व 5 हजार 600 रुपये किंमतीचा 70 किलो कापूस असा एकूण 10 हजार 900 रुपये किंमतीचा आमचा माल चोरून नेला असल्याचे खात्री केली असता समजले. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या