Thursday, April 25, 2024
Homeधुळेसहा लाखांचे सोयाबीनचे कच्चे तेल चोरीस

सहा लाखांचे सोयाबीनचे कच्चे तेल चोरीस

धुळे । Dhule । प्रतिनिधी

शहरातील अवधान औद्योगिक वसाहतीतील डिसान अ‍ॅग्रो टेक कंपनीत सुपरवायझरने हेराफेरी करीत सव्वा सहा लाखांच्या सोयाबीनच्या कच्च्या तेलाची (Soybean crude oil) चोरी केली. दि. 7 नोव्हेंबर रोजी चार वाजेच्या सुमारास हा प्रकार घटला. याप्रकरणी सुपरवायझरसह सहा जणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

- Advertisement -

याबाबत कंपनीचे मॅनेजर अशोक मुकुंदा सोनार (रा. प्लॉट नं. 10 रा. महालक्ष्मी कॉलनी, शिरपूर) यांनी मोहाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डिसान कंपनीत तेल विभागात यापूर्वी वजन काटा ऑपरेटर व सध्या डी.ओ.सी.विभागात सुपरवायझर पदावर कार्यरत असलेला कर्मचारी प्रमोद दिलीप सोनवणे (रा. सौंदाणे ता.धुळे) यांच्या सांगण्यावरुन व मार्गदर्शनानुसार अक्षय हिंंमत नगराळे (रा. संबोधी नगर, सुरत बायपास रोड, धुळे), गिरीष रविंद्र पाटील (रा. सोन्या मारोती कॉलनी, मिल परिसर, धुळे), सुमित हनुमंत मोरे (रा. स्वामी नारायण कॉलनी, साक्री रोड, धुळे) यांनी टँकर चालकांशी संगनमत केले.

कंपनीच्या प्लांटमधून व्यापार्‍यांच्या ऑर्डर व्यतिरिक्त 6 लाख 34 हजार 920 रुपये किंमतीचे 4 हजार 70 किलो ग्रॅम अधिकचे तेल प्लांटमधून चोरी केले. ते टँकर चालक ललित जगन्नाथ भरोदीया (रा. जवाहर टेकडी, धार रोड, इंदौर) व अभिताभ सुकदेव पाटील (रा. जयशंकर कॉलनी, मोहाडी) यांना चोरी करुन टँकरमध्ये भरुन दिले. म्हणून वरील सहा जणांवर भादंवि कलम 381, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मोहाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भुषण कोते हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या