Friday, April 26, 2024
Homeनगरसोयाबीन पिकावर मोझाईक विषाणुच्या प्रादुर्भाव

सोयाबीन पिकावर मोझाईक विषाणुच्या प्रादुर्भाव

बाभळेश्वर |वार्ताहर| Babhaleshwar

सोयाबीन पिकावर सध्या मोझाईक या विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर यांचे माध्यमातून केंद्राचे पीक संरक्षण विषय विशेषज्ञ भरत दवंगे, कृषि विद्या विषय विशेषज्ञ शैलेश देशमुख आणि मृद शास्त्रज्ञ शांताराम सोनवणे यांनी राहाता परिसरातील लोणी, हसनापुर, हणुमंतगाव, दुर्गापूर या गावांमधील सोयाबीन प्लॉटला प्रत्यक्ष भेटी देवून शेतकर्‍यांशी संवाद साधला असता सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात विषाणुजन्य रोगाचा प्रार्द्रभाव वाढत असल्याचे आढळुन आले आहे.

- Advertisement -

हसनापुर या ठिकाणी बैठकीदरम्यान भरत दवंगे यांनी सांगितले की, या रोगाचा प्रादुर्भाव रोगग्रस्त बियाणे आणि रस शोषणार्‍या किडींच्या माध्यमातून होतो. प्रामुख्याने मावा आणि पांढरी माशी या रस शोषणार्‍या किडींमार्फत या विषाणुजन्य रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात होतो आणि ज्यावेळी सोयाबीनला फुले आणि शेंगा येण्यास सुरुवात होते. त्यावेळी या रोगाचा प्रसार जास्त वेगाने होतो.

या रोगामुळे सुरुवातीला पिकाच्या पानांवर पिवळसर नक्षीदार ठिपके दिसू लागतात. रोगट झाडाच्या पानांचा काही भाग हिरवा तर काही भाग पिवळा दिसून येतो. यालाच मोझॅक असे म्हणतात. पानांच्या शिराजवळ पिवळे डाग दिसून येतात आणि शेंड्याकडील पाने पिवळी पडून वाळून जातात. अशा रोगग्रस्त रोपांना कमी प्रमाणात फुले लागतात त्याचप्रमाणे शेंगामध्ये दाणे भरत नाही परिणामी उत्पादनात घट येते.

सोयाबीनमध्ये या विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पेरणीपासूनच अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सुरुवातीलाच पेरणीच्या वेळी मुख्य अन्नद्रव्यांबरोबर सल्फर, मॅग्नेशियम आणि कॅल्शीयम या दुय्यम अन्नद्रव्यांचाही वापर करणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर सुध्दा सेंद्रिय खतात मिसळून करणे आवश्यक आहे. जेणेकरून सोयाबीनचे संतुलित पोषण होवून रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच मावा आणि पांढरी माशी या रस शोषणार्‍या किडींवर प्रतिबंध ठेवण्यासाठी आंतरप्रवाही किटकनाशकांची फवारणी वेळेवर करणे अत्यंत गरजेचे आहे.

सद्य परिस्थितीमध्ये या विषाणुजन्य रोगावर प्रतिबंध ठेवण्याच्या दृष्टीने त्वरित चिलेटेड मॅन्गनीज अर्धा ग्रॅम अधिक पोटॅशियम मॉलीब्डेट अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी या सुक्ष्म अन्नद्रव्यांची एकत्रित फवारणी करावी आणि त्यानंतर एक आठवड्याने इमामेक्टीन बेंझोएट अर्धा ग्रॅम किंवा बिटा सायफ्ल्यूमिन अधिक इमिडॅक्लोप्रिड हे संयुक्त किटकनाशक 1 मीली प्रति लिटर आणि त्या सोबत चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रीयंट अर्धा ग्रॅम प्रति लिटर यांची एकत्रित फवारणी करावी, असे दवंगे यांनी सांगितले.

यावेळी केंद्राचे मृद शास्त्रज्ञ शांताराम सोनवणे शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले. सरपंच अफजल पटेल, मच्छिंद्र घोलप, सुभाष करीर, बन्शी तांबे, अब्बास पटेल, पीर मोहम्मद पटेल, जुल्फीकार पटेल, अन्दर इब्राहीम, अरसु हसन, नाना अनर्थ, शब्बीर उमर, समिर पटेल, बाबालाल कटारीया, प्रशांत वाकचौरे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या