Friday, April 26, 2024
Homeनगरज्वारी, मका पेरणीला प्राधान्य द्या

ज्वारी, मका पेरणीला प्राधान्य द्या

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

दोन दिवसांपासून नगर जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली आहे. होणार पाऊस हा रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी पोषक असून अनेक ठिकाणी पेरणीलायक पाऊस झालेला आहे. यामुळे शेतकर्‍यांनी शेताची मशागत करून ज्वारी आणि मका पिकांच्या पेरणीला प्राधान्य द्यावे, राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून यंदा ज्वारी व मका पिकाचे क्षेत्र वाढवण्याच्या सुचना असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी सुधाकर बोराळे यांनी दिली.

- Advertisement -

जिल्ह्यात गुरूवारी रात्रीपासून पावसाला सुरूवात झाली आहे. होणार हा पाऊस खरीप हंगामातील काही पिकांना जीवदान ठरला असून रब्बी हंगामातील पिकांसाठी फायदेशीर आहे. गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यात रब्बी हंगामात गहू आणि हरभरा पिकांचे क्षेत्र वाढलेले आहे. मात्र, गव्हाचे निघणारे नियंत्रित उत्पादन आणि कमी भाव या तुलनेत ज्वारीचे उत्पादन आणि भाव जादा आहे. या शिवाय ज्वारीच्या जनावरांच्या चार्‍यासाठी उपयोग होत आहे. ज्वारीपासून मिळणार्‍या वैरणीला मोठी मागणी असून दरही चांगले मिळत आहे. यासह ज्वारीचे क्विंटलचे दर हे पाच हजारांच्या पुढे असल्याने यंदा शेतकर्‍यांनी ज्वारी आणि मका पिकांची रब्बी हंगामात अधिकाअधिक पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

जिल्ह्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र 2 लाख 67 हजार हेक्टर आहे. वास्तवात नगर जिल्हा ज्वारीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही वर्षात अनावश्यकपणे गव्हाचे क्षेत्र वाढले असून या पिकांचा आर्थिक फायदा शेतकर्‍यांना होतांना दिसत नसल्याचे कृषी विभागाचे निरिक्षण आहे. यामुळे यंदा राज्य पातळीवरून कृषी विभागाने जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र वाढवण्यावर भर देण्याच्या सुचना केल्या आहेत. मागील वर्षी जिल्ह्यात दीड लाखांच्या जवळपास ज्वारीची पेरणी झाली होती. यंदा ती पुन्हा दोन लाख हेक्टरपर्यंत वाढण्याचा प्रयत्न आहे. तसेच यंदा दृष्काळसदृष्टी स्थिती असण्याची शक्यता असल्याने चारा पिक म्हणून मका पिकावर भरण्यात येत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी मका पिकाचे क्षेत्र 15 हजार हेक्टर होते. ते वाढवून यंदा 74 हजार करण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न असल्याचे अधीक्षक बोराळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या