Thursday, May 2, 2024
Homeनगरपीएम केअर फंडातून 27 व्हेंटिलेटर

पीएम केअर फंडातून 27 व्हेंटिलेटर

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

पीएम केअर फंडातून नगरच्या जिल्हा रुग्णालयातील नव्या आयसीयूला 27 व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. जिल्ह्यात करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता नोबल मेडिकल फाउंडेशनतर्फे जिल्हा रुग्णालयामध्ये 20 खाटांचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. या विभागाचे उद्घाटन रविवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाले

- Advertisement -

कार्यक्रमाला खा. डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, नोबल फाउंडेशनचे डॉ. बापूसाहेब कांडेकर आदी उपस्थित होते. वाढत्या करोना संसर्गामुळे जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग अपुरा पडत होता. यासाठी नोबल फाउंडेशनच्या सहकार्याने या ठिकाणी नव्याने 20 खाटांचा अतिदक्षता विभाग उभारण्यात आला आहे.

यावेळी बोलताना डॉ. विखे यांनी आरोप-प्रत्यारोप करणे सोपे आहे. पण किमान डॉक्टर नसलेल्या माणसाने कुठल्याही आरोग्य विषयक यंत्रणेवर टिकाटिपण्णी करू नये. पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री सर्वच काम करीत आहेत. आम्ही सर्वच जण काम करीत आहोत. माझी सर्वच राजकीय लोकांना विनंती आहे की त्यांनी डॉक्टर व डॉक्टरांचे इक्यूमेंटवर टिकाटिपण्णी करू नये, असा सल्ला डॉ. विखे यांनी राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांचे नाव घेता दिला.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करोनाचे संक्रमण वाढल्यामुळे करोना टेस्ट रिपोर्ट पेडिंग राहण्याचे प्रमाण वाढले आहे. रिपोर्ट येण्यास 48 तास लागत आहेत. पण रिपोर्ट पेडिंग न राहाता 8 तासात ते यावेत. यासाठी आम्ही आमच्या विळदघाट येथील लॅबमध्ये सरकारी दरापेक्षा 30 टक्के कमी दराने चाचणी करून देऊ, अशी घोषणाही डॉ. विखे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या