नगावचे येथील उपशिक्षक अपघातात ठार

सोनगीर – Songir – वार्ताहर :

मुंबई-आग्रा महामार्गावरील सरवड शिवारातील पेट्रोलपंपा समोर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत उपशिक्षक जागीच ठार झाले. तर

एक जखमी झाला आहे. हा अपघात आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरूध्द सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सोनगीर येथे एका महिला नातेवाईकावर अंत्यविधी झाल्यानंतर विशाल चिंधु पवार (वय 40 रा. धुळे) व राकेश महेंद्र पवार हे दोघे दुचाकीने (क्र. एमएच- 18 एक्स- 8265) धुळ्याकडे निघाले होते.

सरवड शिवारातील आर.आर पेट्रोलपंपच्या समोर मागून भरधाव वेगाने येत असलेल्या एका अज्ञात ट्रक ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक मारली.

त्यात विशाल पवार हे खाली पडल्याने त्यांच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

तर राकेश माळी हे बाजुला फेकले गेल्याने किरकोळ जखमी झाले. यावेळी नागरिकांच्या मदतीने दोघांनाही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र विशाल पवार यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. विशाल पवार हे नगांव येथील कै.आण्णासाहेब द.वा.पाटील माध्यमिक विद्यालयात उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर धुळे येथे सायंकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान अपघातप्रकरणी राकेश पाटील यांनी सोनगीर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनाचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना रविंद्र ठाकूर करीत आहेत.

मन सुन्न करणारी घटना

सोनगीर येथे नातेवाईकाची अंत्ययात्रा झाल्यानंतर सरवड फाट्याजवळ विशाल पवार यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली.

त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर मागवून एका वाहनाने त्यांची पत्नी व बहीण हे येत होते.

रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला स्थितीत पाहून विशाल पवारच्या पत्नीसह परिसराने हंबरडा फोडला. डोळ्यादेखत घडलेल्या दुर्देवी घटनेत सर्वाच्या डोळ्यात पाणी आले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *