Friday, April 26, 2024
Homeनगरसोलापूर महामार्ग देतोय मृत्यूला निमंत्रण

सोलापूर महामार्ग देतोय मृत्यूला निमंत्रण

अहमदनगर|वार्ताहर|Ahmednagar

नगर सोलापूर महामार्गावर सध्या अपघातांचे प्रमाण वाढले असून हा रस्ता साक्षात मृत्यूला आमंत्रण देत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. शहरातून जाणार्‍या विविध महामार्गांपैकी सोलापूर महामार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा आहे. या रस्त्यावरून छोटामोठ्या वाहनांबरोबरच अवजड वाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. तसेच नित्याच्या दैनंदिन कामासाठी नगर येथे रोज येणार्‍या चाकरमान्यांची संख्याही जास्त असते.

- Advertisement -

दरम्यान, पावसामुळे या महामार्गाची दुर्दशा झाली असून रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. महामार्गावरील दरेवाडी ते मिरजगावपर्यंत रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असल्याने लहान वाहनधारकांना खड्डे चुकवताना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे.

रस्त्याच्या साईडपट्ट्या फूटभर खचल्या असून छोट्या वाहनधारकांना ऐनवेळेस वाहन खाली घेणे जिकिरीचे होत आहे. यापूर्वीही खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक दुचाकीस्वरांना जीव गमवावा लागला आहे. रस्ता चौपदरी करणाचे भिजत घोंगडे अजूनही तसेच असले तरी किमान साईटपट्ट्या भरून खड्डे बुजविण्यात यावेत अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

महामार्गावरील पारगाव, शिराढोण, दहिगाव, साकत, रुईछत्तीसी आदी ठिकाणी रस्त्याची चाळण झाली आहे तर वाळुंज रेल्वे क्रॉसिंग गेट जवळ खड्डे पडून त्याला एखाद्या नाल्याचे स्वरूप आले आहे. संबंधित विभागाला याचे काहीच सोयरसूतक नसून नागरिकांच्या मूलभूत हक्कांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. संबंधित विभागाने याची त्वरित दखल घेत खड्डे बुजवावेत अशी मागणी वाहनधारक व परिसरतील नागरिकांमधून होत आहे.

करोना साथ रोगामुळे रस्त्यावरील वाहतूक काहीअंशी कमी झाली. परंतु रस्ता मोकळा असल्याचा गैरफायदा घेत चारचाकी वाहने अतिशय बेफिकिरीने व सुसाट धावताना दिसत आहेत. त्यांच्या बेशिस्त वाहन चालवण्यामुळे लॉकडाऊन काळात अत्यावश्यक कामासाठी चाललेल्या अनेक दुचाकी स्वरांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच रोडवर पडलेले खड्डे दुचाकीस्वरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहेत.

करोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे. खासगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. 22 मे इोजी एसटी बस सुरू झाली. परंतु प्रवाशांअभावी बसच्या फेर्‍याही कमी आहेत. त्यामुळे अत्यावश्यक कामासाठी शहरात जाण्यासाठी सर्व सामान्यांना मोटारसायकल हाच एकमेव पर्याय आहे. परिणामी सर्वच रस्त्यावर मोटारसायकलस्वारांची संख्या वाढलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या