Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकसोसायटी निवडणुकीने मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

सोसायटी निवडणुकीने मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

निफाड | निफाडनामा | आनंदा जाधव Niphad

औरंगाबाद खंडपीठाच्या (Aurangabad Bench) निर्णयाने बाजार समितीच्या निवडणुका (Market committee elections) स्थगित करण्यात आल्याने आता तालुक्यातील विकास सोसायट्यांचा रणसंग्राम रंगणार असून पिंपळगाव बाजार समिती (Pimpalgaon Market Committee) कार्यक्षेत्रातील 45 तर लासलगाव (lasalgaon) बाजार समिती कार्यक्षेत्रातील 52 विकास सोसायट्यांच्या निवडणूका (election) होत असल्याने

- Advertisement -

आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून विकास सोसायट्यांसह जि.प., पं.स. बाजार समित्या आपल्याच अधिपत्याखाली याव्या यासाठी आमदार दिलीप बनकर (mla dilip bankar), माजी आमदार अनिल कदम (former mla anil kadam) तर भाजपचे (bjp) यतीन कदम प्रयत्न करतील. साहजिकच पुढील वर्ष हे निवडणुकांचेच असल्याने येथे तालुक्यासह गावपातळीवरील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

निफाड तालुक्यात (niphad taluka) जवळपास 97 विकास सहकारी सोसायटीसाठी निवडणुका होत असल्याने गावपातळीवरील राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. कारण बाजार समिती निवडणुका आधी सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका होत असल्याने जो सोसायटीत निवडून जाईल त्यास बाजार समितीसाठी मतदानाचा हक्क (Right to vote) प्राप्त होणार आहे. तसेच उमेद्वारी देखील करता येणार आहे.

साहजिकच विद्यमान सोसायटी संचालकांचा मात्र चांगलाच हिरमोड झाल्याने त्यांना आता सोसायटीत पुन्हा निवडून यावे लागणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत एका-एका मताला लाखमोलाचा भाव येत असल्याने प्रथम सोसायटीत निवडून जाण्यासाठी गावपातळी वरील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातच पिंपळगाव बाजार समिती अंतर्गत 45 विकास सोसायट्यांच्या निवडणुका होत असून

येथील मतदार हा सधन असल्याने विकास सोसायटीच्या निवडणुकीत आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होण्याचे संकेत मिळत आहेत. या सोसायट्यांमध्ये ओझर, चांदोरी, सायखेडा, पिंपळगाव, पालखेड, म्हाळसाकोरे, शिंगवे, चाटोरी, साकोरे मिग, कसबे सुकेणे आदी सोसायट्यांच्या निवडणुकांचा समावेश असल्याचे समजते. तर याच परिसरात नेत्याचा भरणा देखील सर्वाधिक आहे.

त्यामुळे सोसायटीच्या या निवडणुकीत आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम यांचे गट समोरासमोर उभे ठाकतील तर आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवत भाजपचे यतीन कदम देखील अनेक सोसायट्यांमध्ये आपले कार्यकर्ते उतरवतील. त्यामुळे सोसायटी बरोबरच त्यानंतर होणार्‍या जि.प. व पं.स. च्या निवडणुका देखील चुरशीच्या होण्याचे संकेत मिळत असून सोसायटी निवडणुकीसाठी बाजार समिती उपसभापति दीपक बोरस्ते, विजय कारे,

सिद्धार्थ वनारसे, सुरेश कमानकर, संदीप टर्ले, भागवतबाबा बोरस्ते, राजेंद्र मोगल, शरद शिंदे, नंदू सांगळे, विलास बोरस्ते, शरद काळे, पंडीत आहेर, लक्ष्मण निकम, सोपान खालकर आदी नेत्यांना गावपातळीवरील पॅनल निवडून आणण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. याबरोबरच लासलगाव बाजार समिती अंतर्गत देखील सर्वाधिक 52 विकास सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका होत असल्याने

ज्यांनी बाजार समिती निवडणुकीसाठी व्यूहरचना चालविली होती त्यांचे आशेवर पाणी फिरले आहेत. लासलगाव बाजार समितीत पक्षापेक्षा गटाला सर्वाधिक महत्व दिले जाते. मात्र ऐनवेळी कोण कोणत्या गटात सामील होईल हे सांगणे अवघड असून येथे मातब्बर नेत्यांचा भरणा सर्वाधिक असल्याने बाजार समितीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सोसायटीचा रणसंग्राम होत असल्याने विकास सोसायटीची सत्ता आपल्याच अधिपत्याखाली रहावी यासाठी नेते प्रयत्न करतील.

मात्र सोसायटीच्या या निवडणुकीत गावपाटीलकीच्या नेत्यांची कसोटी लागणार असून अनेक मातब्बर नेत्यांना आपल्या होमपीचवरील सोसायटी ताब्यात ठेवण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. लासलगाव बाजार समिती अंतर्गत बाजार समिती सभापति सुवर्णा जगताप, मुंबई बाजार समिती संचालक जयदत्त होळकर, माजी आमदार कल्याणराव पाटील, जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर,

जि.प.चे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे, सुभाष कराड, शिवा सुरासे, अनिल कुंदे, हरिश्चंद्र भवर, दत्तात्रय डुकरे, राजेंद्र बोरगुडे, शिवाजी तासकर, भास्कर पानगव्हाणे, सोमनाथ पानगव्हाणे, विजय सदाफळ, अजित सानप, संपत डुंबरे, तानाजी पुरकर, बबन सानप, वैकुंठ पाटील अशा मातब्बर नेत्यांना आपआपले गड शाबूत ठेवावे लागणार आहे किंवा सोसायटी ताब्यात ठेवावी लागणार आहे.

सोसायटी निवडणुकीनंतर लागलीच बाजार समिती व जि.प. चा रणसंग्राम सुरू होत असल्याने पुढील वर्षभर मतदारांची दिवाळी साजरी होणार असून उमेद्वारांचे मात्र दिवाळे निघणार आहे. मात्र पुढील पाच वर्ष सत्ता ताब्यात रहावी यासाठी हे मातब्बर नेते रात्रीचा दिवस करतील हे मात्र निश्चित. त्यामुळे तालुक्यातील महत्वाची सत्तास्थाने आपल्याच अधिपत्याखाली रहावी यासाठी आगामी काळात पॅनल निर्मिती,

शह-काटशह यांना वेग येणार असून जसजसी निवडणूक जवळ येत जाईल तसतसा निवडणुकीचा ज्वर वाढत जाणार असून मुद्याची लढाई गुद्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेस आदी पक्ष कार्यरत असून त्यानंतर मनसे, बसपा, रिपाई, स्व.भा.प., आम आदमी पक्ष, प्रहार या पक्षांचा देखील थोडाफार बोलबाला आहे.

त्यामुळे येथे प्रत्येकाला पक्ष वाढविण्याची व आपल्याच कार्यकर्त्याची वर्णी लावण्याची घाई झाल्याने सोसायटी नंतर बाजार समिती व त्यानंतर होणार्‍या जि.प. निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपले नशिब अजमाविण्याची शक्यता असल्याने तत्पूर्वी कार्यकर्ते वाढविणे व त्यांना निवडणुकीच्या प्रवाहात आणण्याचे आवाहन या पक्षाच्या नेत्यांना पेलावे लागणार आहे.

सर्वसधन तालुका म्हणून निफाडची ओळख असल्याने येथे नेते जास्त अन् कार्यकर्ते कमी अशी काहिशी अवस्था आहे. त्यातच सहकाराची निवडणूक होत असल्याने या सहकाराच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करण्याचे दिवास्वप्न अनेक तरूण पाहत असल्याने सोसायटीचे पॅनल निर्मिती करतांना प्रमुख नेत्यांपुढे डोकेदुखी ठरणार आहे. एकूणच सोसायटीच्या निवडणुकीपासून तालुक्यात निवडणुकीचा ज्वर वाढण्यास सुरुवात होवून ते विधानसभा निवडणुका पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याचे दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या