Thursday, April 25, 2024
Homeनगरसामाजिक कार्यकर्त्यावरील हल्लाप्रकरणी साकुरच्या तिघांना अटक

सामाजिक कार्यकर्त्यावरील हल्लाप्रकरणी साकुरच्या तिघांना अटक

घारगाव |वार्ताहर| Ghargav

साकुरचे सामाजिक कार्यकर्ते सुनील नामदेव इघे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध वाढीव कलम लावण्यात आले असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तिघांना संगमनेर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 4 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

ग्रामसभेत झालेली मारहाण व धमकीची घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार देऊन घरी परतत असताना दोन वाहनांतून आलेल्या टोळक्याने संगमनेर तालुक्यातील साकूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील नामदेव इघे या तरुणावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि.30) रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास हिवरगाव पठार मार्गे धुमाळवाडी परिसरात घडली होती.

याप्रकरणी सुनील इघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर बाजार समितीचे माजी सभापती शंकर हनुमंत खेमनर, कारखान्याचे संचालक इंद्रजित अशोक खेमनर यांच्यासह अनमोल शंकर खेमनर, हर्षद शंकर खेमनर, रफिक अब्दुल चौगुले, आबा वाकचौरे, गणपत पवार (सर्व रा. साकूर), ग्रामसेवक नागेश पाबळे या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास ग्रामसचिवालय साकुर येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर ग्रामसभेस ग्रामसेवक, पदाधिकारी यांसह नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यांसह 150 ते 200 ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित होते. त्यावेळी ग्रामस्थांचे वतीने इघे यांनी जोगेपठार येथील ग्रामस्थांना पाणी पुरवठा होत नसलेबाबत ग्रामसेवक पाबळे यांना प्रश्न केला असता ग्रामसभेत वादावादी झाली.

इघे यांना शंकर खेमनर, इंद्रजीत खेमनर, अनमोल खेमनर, हर्षद खेमनर, रफिक चौगुले, आबा वाकचौरे, गणपत पवार, ग्रामसेवक नागेश पाबळे यांनी शिवीगाळ दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आमचे विरुध्द आवाज उठवला तर तुला कायमचा संपवून टाकीन. आमचे विरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुझ्यावर आम्ही ग्रामसेवकाकरवी गुन्हा दाखल करु अशी धमकी दिली असल्याचे इघे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

धमकी दिल्याप्रकरणाची फिर्याद देवून सुनिल इघे हे बिलाल सजन शेख व प्रभाकर सुखदेव कदम यांच्यासोबत हिवरगाव पठार मार्गे घरी परतत असताना ते रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास धुमाळवाडी शिवारात आले असता दोन वाहनांतून आलेल्या टोळक्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला. यात इघे गंभीर जखमी झाले. याबाबतची खबर घारगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल गणेश तळपाडे, नामदेव बिरे, होमगार्ड मोहम्मद सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस येत असल्याची कुणकुण लागताच हे टोळके पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या इघे यांना संगमनेर येथे उपचारासाठी पाठविले.

इघे यांनी दिलेल्या जबाबावरून घारगाव पोलीस ठाण्यात सुजित अशोक खेमनर, अनमोल शंकर खेमनर, आबा वाकचौरे (पुर्ण नाव माहित नाही), बाजीराव सतु खेमनर, संतोष धोंडीभाऊ खेमनर, उमेश अशोक गाडेकर, गणपत बाळासाहेब पवार, किशोर बापु गाडेकर, रफिक सिकंदर चौगुले, भगवान सुभाष शेंडगे, लखन सुभाष शेंडगे, बालम सुलेमान पटेल, दत्तात्रय सुभाष रेणुकादास, फिरोज सरदार पटेल, सुधिर सयाजी फटांगरे, कल्पेश गडगे (पुर्ण नाव माहित नाही), सर्व रा. साकुर व इतर 10 ते 15 अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इघे यांस अडवून टॉमी, गज व काठ्यांनी मारहाण करुन सुजित खेमनर याने डोक्यास रिव्हॉल्व्हर लावून जिवे मारण्याची धमकी दिली. गणपत पवार, किशोर गाडेकर व कल्पेश गडगे यांनी फिर्यादीचे गळ्यातील चैन व 28 हजार रुपयांची रोख रक्कम काढून घेतली. सुजित खेमनर व अनमोल खेमनर यांनी फिर्यादीचे तोंडामध्ये काहीतरी औषध टाकले. दुचाकीचेही नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील हे करत आहे. याप्रकरणी पोलिसांनी रात्री दोन वाजता बाजीराव खेमनर, संतोष खेमनर, सुधीर फटांगरे यांना ताब्यात घेतले असून त्यांना शनिवारी संगमनेर येथे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 4 जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांनी संगमनेर बाजार समितीचे माजी सभापती व साकुर गावचे प्रमुख शंकर हनुमंता खेमनर व इंद्रजित अशोक खेमनर व इतरांवर खोटे गुन्हे दाखल करून गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याने हे गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा आमरण साखळी उपोषण व रस्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी व व्यापार्‍यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे, काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे, काँग्रेसचे बाळासाहेब कुर्‍हाडे यांसह साकुर गावचे व्यापारी व ग्रामस्थांनी शनिवारी सायंकाळी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे, आमच्या साकूर गावातील काही विघ्नसंतोषी समाजकंटक व स्वयंघोषीत समाजसेवक यांनी गावचे प्रमुख व इतरांवर खोटे गुन्हे दाखल करून गावात दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला आहे. हे खोटे गुन्हे जोपर्यंत मागे घेत नाहीत तोपर्यंत संपूर्ण गाव बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच दोन जानेवारीला घारगाव पोलीस स्टेशनसमोर साखळी उपोषण व त्याच दिवशी पुणे-नाशिक महामार्ग राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या