सामाजिक आरोग्य सशक्तीकरणाचे दिवस

jalgaon-digital
3 Min Read

सरिता पगारे

दिवाळी हा दीपोत्सव! Diwali Festival दिव्याच्या प्रकाशाने जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून दीपोत्सव Dipostav साजरा केला जातो. आपले सगळेच सण साजरे करण्यामागे काही ना काही शास्र आहे, आख्यायिका आहेत. परंपरागत पद्धतीने हे सण साजरे करण्यामागे जसा आपल्या शरीरस्वास्थ्याचा विचार आहे, तसाच मानसिक, सामाजिक, आर्थिक, आणि कौटुंबिक आरोग्याचाही विचार केला गेला आहे.

शाळा महाविद्यालयांना दिवाळीची किमान दोन आठवड्यांची सुट्टी असते. मग घरात साफसफाई, दिव्या पणत्यांच्या रोषणाईची तयारी, आकाशकंदील बनवणे किंवा विकत आणणे, नवीन कपड्यांची खरेदी, बच्चे कंपनीची किल्ला बनवण्याची मज्जा, दिवाळीचा फराळ बनवणे, त्यासाठी कधी शेजारच्या काकुंना चकलीची रेसिपी विचारणे, त्यांची चकली कशी सगळ्यांच्या चकलीपेक्षा सरस असते हे त्यांना सांगणे. यातून त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद कशात मोजणार? कधी कधी मिळून काही पदार्थ बनवणे. अशा एक न अनेक गोष्टी घराघरातून व्हायला लागतात.

या सगळ्यांमध्ये कुटुबांतील सगळ्यांचा सहभाग असतो. कधी जवळच्या चुलत- मावस भावंडाबरोबर ही सर्व तयारी तर कधी मित्र मैत्रीणींबरोबर. या सगळ्यांतून निर्माण होते ती सहकाराची परस्परांवलंबनाची भावना. मग एकमेकांकडे जाणे, शुभेच्छा देणे, त्यांनी केलेल्या गोष्टींचे कौतुक करणे असो किंवा त्यांना आपल्याकडे बोलावणे असो. ह्या सगळ्याकडे मी एक मानसशास्रज्ञ म्हणून बघते तेव्हा मला जाणवते की सण साजरे करण्याचा आणि आपल्या मनस्वास्थ्याचा जवळचा संबंध आहे. जसे म्हणतात की, आपल्या आनंदात इतरांना सहभागी केल्याने आपला आनंद द्विगुणित होतो. त्याप्रमाणे काळाबरोबर सण साजरे करण्याच्या पद्धतीत जरी काही बदल झाले असले तरी, दिवाळी जशी आपण शेजारी मित्र-मैत्रिणी, जवळ राहणारे नातेवाईक यांच्याबरोबर साजरी करतो तसेच आपण बरेच जण दिवाळीच्या सुट्टीत आजोळी, मामा-मावशींकडेही जातो. अलीकडे तर सगळे ठरवून, प्लॅनिंग करून कुठे बाहेर सुट्टी घालवायला जातात. हेतू एकच, सगळे जमले की मज्जा येते.

लहान मुले तर जणू याची वाटच बघत असतात. आजी असेल, आत्या असेल तर ती हटकून भावाला किंवा नातवांना अमूक आवडते म्हणून ते बनवते. आल्या आल्या जवळ घेते. प्रसंगी नातवांना अभ्यंगस्नान घालते. जवळ झोपायला घेते. ही कीती मोठी टच थेरपी आहे. कधी मावशी-मामाबरोबर बाहेर जाणे, आवडलेली एखादी वस्तू घेणे. आपल्या मनातील गोष्टी-सल मामा मावशीशी शेअर केल्यावर मोकळे वाटणे, मन हलके होणे, ह्यातून विश्वास आधार आणि प्रेम मिळते. आपल्याला व्यक्त व्हायला जागा आहे ही जाणीव नकळत आपल्या नात्याची विण घट्ट करत असते. कधी एखाद्या आत्या-मामीने भाचा-भाचीच्या आवडीचा बेत करणे, त्याला प्रतिसाद म्हणून त्यांनी आत्या, मामीला ‘तू कसे हे सगळे लक्षात ठेवून करते’ अशी एखादी छोटीशी कमेंट करणे हेही तिला स्फूर्ती देते. आपण एकमेकांच्या जवळ येतो, सुखावतो. थोडक्यात ह्या सगळ्यांतून एकमेकांचे संबंध दृढ होत जातात.

विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पडलेले अंतर कमी होते. एकमेकांबद्दलची आपुलकी प्रेम जिव्हाळा वाढतो आणि ही प्रेमाची शिदोरी पुढल्या दिवाळीपर्यंत आठवणींच्या स्वरुपात आपल्याबरोबर असते. ही एकमेकांच्या नात्यातली दृढ झालेली आणि आपलेपणाची भावना मनुष्याचे भावनिक आणि सामाजिक आरोग्य नक्कीच सशक्त करते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *