Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगBlog : दो गज दुरी, मास्क है जरूरी!

Blog : दो गज दुरी, मास्क है जरूरी!

नाशिक | एन. व्ही. निकाळे

जवळपास आठ महिने लोटल्यानंतर आणि उच्चांक गाठल्यानंतर भारतात ‘करोना’ची त्सुनामी आता ओसरत आहे. ऑगस्ट-सप्टेंबरातील रुग्णवाढीचा वेग निम्म्यावर आला आहे. रुग्ण वेगाने बरे होत आहेत. तथापि नवी भर थांबलेली नाही. भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर पोहोचले आहे, 77 लाखांवर रुग्ण बरे झाले आहेत, असे सरकारी आकडेवारी सांगते. देशात 5 लाखांहून जास्त रुग्ण आजही उपचार घेत आहेत. त्यात दररोज 50 हजारांची भर पडत आहे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सरकार म्हणते त्याप्रमाणे रुग्ण बरे होत असतील व मृत्यू टळत असतील तर ती नक्कीच दिलासादायी बाब आहे. तरीही संसर्ग पुन्हा फैलावू नये याची दक्षता यापुढेही घ्यावी लागेल…

- Advertisement -

स्वतंत्र भारताला पंडित जवाहरलाल नेहरूंसारखे उदारमतवादी नेतृत्व लाभले. लोकशाही पद्धत नव्याने भारतीय राजकारणात रुजली. त्यानंतरच्या दोन-तीन पिढ्या मुक्त वातावरणात वाढल्या. काहीशा मोकळेपणाने स्वच्छंदी नागरी जीवन देशात दिसू लागले. गेल्या काही काळात आणि विशेष करून ‘करोना’निमित्ताने नागरी जीवनातील मोकळेपणावर अनेक निर्बंध लादले गेले आहेत. प्रत्येक घराभोवती सुरक्षेचे कारण सांगून ‘अदृश्य लक्ष्मणरेषा’ ओढली गेली.

ती ओलांडू नका, असे कळकळीने वेळोवेळी फर्मावले गेले. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर मुसके (मास्क) आले. दवाखाना वा रुग्णालयात नकोशा उग्रवासाने अस्तित्वाची जाणीव करून देणार्‍या स्वच्छोदकाचा (सॅनिटायझर) मानपान आणि महत्त्व अधिक वाढले. ‘दो गज दुरी, मास्क है जरूरी’ या मंत्राचा जप सतत केला जात आहे.

आरोग्य सुरक्षा आणि संसर्गबाधेपासून वाचण्यासाठी चेहरा झाकण्याची वेळ प्रत्येकावर आली. दोन, पाच, दहा, वीस, पन्नास मोजता-मोजता दिवसागणिक रुग्णसंख्या झरझर वाढत गेली. वाढतच राहिली. आता ती 85 लाखांच्या आसपास पोहोचली आहे. मध्यंतरी रुग्णवाढीची गती दिवसाला लाखांवर गेली होती.

रुग्णवाढीचा हा वेग उरात धडकी भरवणारा होता. मात्र केंद्र सरकार, राज्य सरकारे, आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन यांच्या प्रयत्नांना आता कुठे काही प्रमाणात यश येत आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरातील रुग्णवाढीला काहीसा उतार आला आहे. रुग्णवाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचा वेग दुप्पटीवर पोहोचला आहे.

जगात, भारतात आणि महाराष्ट्रात ‘करोना’बाबत वेगवेगळी स्थिती आढळून येत आहे. काही देशांत आटोक्यात आलेल्या ‘करोना’ने पुन्हा उसळी मारली आहे. युरोपीयन देशांत ‘करोना’च्या दुसर्‍या लाटेचे आव्हान उभे ठाकले आहे. ‘करोना’ला अटकाव करण्यासाठी फ्रान्समध्ये 1 नोव्हेंबरपासून पुन्हा टाळेबंदीची वेळ आली आहे. ब्रिटनमध्ये ‘करोना’ आटोक्यात आला होता, पण त्याने पुन्हा उचल खाल्ली आहे.

तेथे महामारीची दुसरी लाट वेगाने आली आहे. ‘करोना’शी दोन हात करताना अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचीही दमछाक होत आहे. ‘करोना’चे माहेर असलेल्या चीनने सर्वात आधी ही महामारी रोखण्यात यश मिळवले, पण तेथेही नव्याने रुग्ण आढळल्याने चीन सरकारने त्याची गांभीर्याने दखल घेतली व तातडीने उपाय योजले. जगातील ही उदाहरणे पाहता भारतातही सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे.

ट्रम्प यांच्या पराभवामुळे भारतातील नवी लाट काहीशी थोपवली जाण्याचा संभव वाढला आहे. भारतातील संसर्गाची तीव्रता कमी होत आहे. रुग्णसंख्येत दिवसाकाठी भर पडत असली तरी तिचे प्रमाण कमी आहे. महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक संसर्गबाधित राज्य ठरले, पण ही परिस्थितीही आता बदलत आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे. भारतात आतापर्यंत सव्वा लाखांहून जास्त लोक ‘करोना’ने मृत्युमुखी पडले आहेत.

दिल्लीत काही दिवसांपासून 5 ते 7 हजारांच्या आसपास नवे रुग्ण आढळत आहेत. राजधानीत ‘करोना’ची तिसरी लाट आल्याचे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. दिल्लीबाबतची ही बातमी इतर राज्यांना वेळीच सावध करणारी आहे.

बिहार निवडणुकीत प्रचारादरम्यान ‘दो गज दुरी’चा विसर बहुतेक नेते आणि प्रचारसभांना गर्दी करणार्‍या लोकांनासुद्धा पडल्याचे पाहावयास मिळाले. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारावेळी झालेल्या गर्दीमुळे 30 हजार लोक संसर्गबाधित झाल्याच्या बातम्या झळकल्या आहेत.

हल्ली मुसके (मास्क) ही सुरक्षेची गोष्ट राहिली नसून ती शोभेची, किंबहुना प्रदर्शनाची वा गळ्यात अडकवण्याची वस्तू बनली आहे. अशिक्षितच नव्हे तर सुशिक्षितसुद्धा मुसके नाकातोंडाला लावण्याऐवजी गळ्यात घालून मिरवतात. कोणी हटकले तरच तो नाकातोंडावर चढवतात.

सणांचा महिना श्रावण कधी आला आणि गेला हेही यंदा जाणवले नाही. गणेशोत्सव, दहीहंडी, पितृपंधरवडा हेही सरले. नवरात्रापाठोपाठ दसराही आला अन् गेला. आता दिवाळी जवळ येत आहे. त्या आनंदात ‘करोना’चे संकट लोक जणू विसरल्याचे बाजारपेठांतील गर्दीमुळे जाणवते. खरेदीच्या नादात संसर्गाची भीती कुठल्या कुठे पळाली असावी. महाराष्ट्रात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबवली जात आहे.

आपल्या कुटुंबाची काळजी कुटुंबप्रमुखाने घ्यावी, असा या मोहिमेमागील हेतू आहे, पण याआधी ही काळजी कोण घेत होेते हा प्रश्न अजून अनेकांना सतावत आहे. स्वत:चीच काळजी नसलेली मंडळी बेफिकीरपणे वावरत आहेत. गेल्या आठवड्यापासून संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले तरी अशा बेफिकिरीने ‘करोना’ पुन्हा मुसंडी मारण्याची शक्यता काही भीतीग्रस्त माणसे बोलू लागली आहेत.

जमावबंदी असो, संचारबंदी असो वा टाळेबंदी; नियम मोडण्याचा आनंद अनेकांनी गेल्या काही महिन्यांत घेतला आहे. शिस्तीला हरताळ फासणार्‍या कितीतरी जणांना पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद मिळाला. दंडही झाला. तरीही बेशिस्तपणा कमी झालेला नाही. घराबाहेर पडताना मास्क लावा, सुरक्षित अंतर राखा, गर्दी टाळा आदी सूचनांकडे सर्रास काणाडोळा केला जातो. जवळपास आठ महिने लोटल्यानंतर आणि उच्चांक गाठल्यानंतर भारतात ‘करोना’ची त्सुनामी आता ओसरत आहे. ऑगस्ट-सप्टेंबरातील रुग्णवाढीचा वेग आता निम्म्यावर आला आहे. रुग्ण वेगाने बरे होत आहेत.

तथापि नवी भर थांबलेली नाही. भारतात ‘करोना’चा प्रभाव ओसरत असल्याचे केंद्रीय आरोग्य खाते आकडेवारीनिशी दररोज सांगत आहे. भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर पोहोचले आहे, 77 लाखांवर रुग्ण बरे झाले आहेत, असे सरकारी आकडेवारी सांगते. इतकेच नव्हे तर आरोग्य खात्याच्या प्रयत्नामुळे अनेक लाख लोकांचा मृत्यू टळला हेही आधी झोपलेल्या आरोग्य खात्याने तत्परतेने जाहीर केले. देशात 5 लाखांहून जास्त रुग्ण आजही उपचार घेत आहेत. त्यात दररोज 50 हजारांची भर पडत आहे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

‘करोना’ प्रसाराला हवामान नव्हे तर माणसांची बेपवाई कारणीभूत ठरते, असा निष्कर्ष अमेरिकेतील टेक्सॉस विद्यापीठाचे भारतीय वंशाचे संशोधक प्राध्यापक देव नियोगी यांनी काढला आहे. त्याची उपेक्षा करू चालणार नाही. सरकार म्हणते त्याप्रमाणे रुग्ण बरे होत असतील व मृत्यू टळत असतील तर ती नक्कीच दिलासादायी बाब आहे. तरीही संसर्ग पुन्हा फैलावू नये याची यापुढेही दक्षता घ्यावी लागेल.

टाळे उघडण्याची (अनलॉक) प्रक्रिया सुरू आहे. तथापि सार्वजनिक ठिकाणी गर्दीचे चित्र पूर्वीसारखेच दिसत आहे. लोकांच्या सोयीसाठी शहरी बस तसेच एसटी बससेवा टप्प्याटप्प्याने वाढवली जात आहे. मुंबईतील उपनगरी गाड्यांची संख्याही हळूहळू वाढवली जात आहे, पण ती मोठ्या प्रमाणात अजून सुरू झालेली नाही. बसस्थानके आणि रेल्वेस्थानके प्रवाशांनी गजबली आहेत. वाढती गर्दी आणि सुरक्षित अंतर राखण्याबाबत होणार्‍या दुर्लक्षामुळे संसर्ग वाढण्याची भीती वाढत आहे.

देशाची अर्थव्यवस्था उणे 24 टक्क्यांवरून अधिकात येऊन अपेक्षित विकास दर गाठण्याच्या दिशेने वाटचाल करू लागेल आणि ‘करोना’चा आलेख शून्यावर केव्हा येतो याकडे सगळ्यांचेच डोळे लागले आहेत. तथापि नजीकच्या काळात ते संभवेल, असे वाटत नाही. ‘करोना’प्रतिबंधक औषधांचे संशोधन सर्वत्र जोरात सुरू आहे. मात्र सर्व चाचण्या आणि निकषांचे अग्निदिव्य पार करून परिपूर्ण औषध केव्हा बाजारात येणार हे कोण सांगू शकणार? लस आली तरी संसर्गाबाबत गाफिल राहून चालणार नाही.

दिवाळीनंतर ‘करोना’ची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. संसर्ग कमी होत असल्याचे वाटत असले तरी ‘करोना संपला’ असे समजून बेसावध राहणे धोक्याचे ठरेल. कदाचित टाळेबंदीची नामुष्की भारतावरही पुन्हा ओढवू शकते याचे भान प्रत्येक नागरिकाने ठेवले पाहिजे. स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी प्रत्येकाने घेतल्यास ‘करोना’विरुद्धची लढाई भारत खात्रीने जिंकू शकेल.

[email protected]

- Advertisment -

ताज्या बातम्या