Saturday, April 27, 2024
Homeनगरस्नेहलता कोल्हेंना सल्ला देण्याची वर्षा गंगुले यांची लायकी नाही - अलका लकारे

स्नेहलता कोल्हेंना सल्ला देण्याची वर्षा गंगुले यांची लायकी नाही – अलका लकारे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

स्नेहलता कोल्हे यांना सल्ला देण्याइतपत वर्षा गंगुले यांची लायकी नाही. लोकशाहीने सर्वांना बोलण्याचा अधिकार दिला म्हणून कोणी काहीही बोलायचेे का? मागील पाच वर्षात स्नेहलता कोल्हे यांनी अनेक विकासकामे केली ती जनतेसमोर आहेत. उलट गंगुले यांनी पाच वर्षे नगरसेविका असूनही त्यांना स्वतःच्या घरासमोरील साधे गवतही काढता आले नाही. त्यामुळे आपण नगर-मनमाड महामार्ग, तालुक्यातील शेतकर्‍यांचे प्रश्न यावर बोलण्याच्या फंदात पडू नये, असा सल्ला भाजपच्या माजी नगरसेविका अलका लकारे यांनी राष्ट्रवादीच्या वर्षा सुनील गंगुले यांना दिला.

- Advertisement -

स्नेहलता कोल्हे यांनी भरपावसात नगर-मनमाड महामार्गावर आंदोलन केले. नगर-मनमाड महामार्गाची झालेली दयनीय अवस्था आणि नागरिकांचे होत असलेले हाल पाहून सौ. कोल्हे यांनी तसेच भाजप कार्यकर्त्यांनी मुसळधार पाऊस सुरू असतानाही तीन तास आंदोलन केले आणि जनतेच्या ज्वलंत प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

या महामार्गावर कोपरगाव-सावळीविहीर ते शिर्डीपर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे प्रवास करणे मुश्किल झाले आहे. मागील तीन वर्षांत नगर-मनमाड महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे.त्याबद्दल जनतेची ओरड होत असतानाही आ. आशुतोष काळे यांनी गेली तीन वर्षे या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी किंवा रस्ता दुरुस्तीसाठी काहीच केले नाही. आता मात्र ते या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाल्याचे सांगून फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत.

अलका लकारे म्हणाल्या, सौ. कोल्हे यांनी मतदारसंघात अनेक विकासकामे केली, जनतेच्या अडीअडचणी सोडविल्या; परंतु त्याचा कधीही गाजावाजा केला नाही. याउलट आ. काळे हे मात्र सतत बॅनर व फ्लेक्स लावून आपला उदोउदो करून घेत असतात.

स्नेहलता कोल्हे यांनी आमदारकीच्या काळात शासनाकडे पाठपुरावा करून कोपरगाव शहरात नवीन सुसज्ज बसस्थानक, पंचायत समिती, नगर परिषद कार्यालय, वाचनालय, अग्निशमन दल इमारत, गोकुळनगरीतील पूल, बाजार तळ भागात भाजी विक्रेत्यांसाठी ओटे आदी अनेक कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करवून आणला. मात्र, यामध्ये स्वतचे कसलेही योगदान नसताना आ. आशुतोष काळे यांनी स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नातून झालेल्या विविध विकासकामांचा स्वत:च्या हस्ते लोकार्पण सोहळा उरकून फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. आताही ते आपण न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा खटाटोप करत आहेत, असा आरोप अलका लकारे यांनी केला आहे.

सौ. कोल्हे यांनी आंदोलन करताना तोंडावर पडणार नाही याची काळजी घ्यावी – गंगुले

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

लोकशाहीने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. मात्र हे आंदोलन करतांना खायचे दात एक आणि दाखवयाचे दात वेगळे अशी काहींची पद्धत असते. त्यामुळे कधी कधी ही आंदोलनं फसतात व तोंडघशी पडावे लागते. असाच प्रकार माजी आमदारांनी केलेल्या खड्ड्यात बसण्याच्या आंदोलनाचा झाला आहे. त्यामुळे त्यांनी यापुढे आंदोलन करताना काळजी घ्यावी त्यामुळे तोंडावर पडायची वेळ येणार नाही, असा खोचक सल्ला माजी नगरसेविका वर्षा गंगुले यांनी स्नेहलता कोल्हे यांना दिला आहे.

लाटेवर निवडून आलेल्या माजी आमदार पाच वर्ष हवेत होत्या. त्यामुळे त्यांचा विकास देखील फ्लेक्सवरच दिसत होता व जनतेला वेड्यात काढायचे काम बेमालूपणे सुरु होते. त्यामुळे त्रस्त जनतेने त्यांना पाचच वर्षात घरचा रस्ता दाखविला. ज्या नगर-मनमाड महामार्गाला त्यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांच्या पक्षाचे सरकार असतांना त्या राष्ट्रीय महामार्ग करू शकल्या नाही त्या रस्त्याला आ. आशुतोष काळे यांनी राष्ट्रीय महामार्ग दर्जा मिळवून देवून सावळीविहीर ते कोपरगाव या रस्त्यासाठी 178 कोटी निधी मिळविला आहे. मागील पाच वर्षात या अहमदनगर-मनमाड महामार्गाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे या रस्त्याच्या सद्यस्थितीला जबाबदार कोण आहे हे कोपरगावच्या जनतेला चांगले माहित आहे.

आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून सुरु असलेल्या खड्डे बुजविण्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा मागील पाच वर्षात फक्त फ्लेक्सवर विकास करणार्‍या माजी आमदारांचा प्रयत्न फसल्यामुळे त्यांची होत असलेली तनफण समजू शकते. मागील पाच वर्षात कोपरगावच्या शेजारील तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले मात्र तालुक्याला माजी आमदार दुष्काळग्रस्त जाहीर करू शकल्या नाही व शेतकर्‍यांना मदत मिळवून देवू शकल्या नाही. मागील पाच वर्षाचा विकास हा फ्लेक्सवर होता आणि या अडीच वर्षातील विकास हा शाश्वत आहे. त्यामुळे त्यांचा तिळपापड होत आहे.

करोना काळात कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून हजारो बाधित रुग्णांना बरे करण्याचे काम आ. काळे यांनी केले हे आजही लोकांच्या स्मरणात आहे. याउलट आपल्या नेत्यापुढे चमकोगिरी करण्यासाठी शेवटच्या दहा दिवसात शासनाचा आयता दवाखाना दाखवला त्यांच्याकडून जनतेच्या विकासाच्या अपेक्षा राहिल्याच नाहीत. त्यामुळे त्यांची सैरभैर झाली असून खड्डे बुजविण्याचे काम सुरु असतांना खड्डे बुजविण्याचे आंदोलन करून केलेली स्टंटबाजी हे वरातीमागून घोडे असल्याची टीका वर्षा गंगुले यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या