Friday, April 26, 2024
Homeनाशिक'स्मार्ट' गोदाघाट

‘स्मार्ट’ गोदाघाट

नाशिक | वैभव कातकाडे Nashik

नाशिकची ओळख असलेल्या गंगाघाट परिसराचे स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून सुशोभीकरणाचे काम सुरू ( Beautification work of Godaghat )आहे. हे सुशोभीकरणाचे काम करताना स्मार्ट सिटी कंपनी( Smart City Company ), महापलिका प्रशासन ( NMC Administration ) यांच्यात कोणताही ताळमेळ नसल्याने या गंगाघाटाचे सुशोभीकरण होते की, विद्रुपीकरण होत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत पर्यावरणप्रेमी देवांग जानी यांनी दैनिक देशदूतसोबत संवाद साधला असता त्यांनी वस्त्रांतरगृह, कामांचा दर्जा,पर्यावरण, असुविधा या मुद्यांवर चर्चा केली.

- Advertisement -

वस्त्रांतरगृहामुळे अनेक अडचणी

वस्त्रांतरगृह ज्या ठिकाणी आज उभे आहे; खरेतर त्याच्यामुळे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. रामकुंड येथे पश्चिमवाहिनी गोदावरी नदी दक्षिणवाहिनी होते. याठिकाणी सूर्यप्रकाश स्वच्छ येत असल्याने अस्थी पाण्यात वितळत असायच्या. मात्र, वस्त्रांतरगृह बांधल्याने सूर्यप्रकाश येणे नाहीसे झाले आणि अस्थी वितळण्यास अडचण निर्माण झाली. त्यासोबतच दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. या कुंभमेळ्याच्या पर्वणीच्या दिवशी शाही स्नानासाठी अनेक भाविक रामकुंडावर गर्दी करतात. या ठिकाणी वस्त्रांतरगृह असल्याने गोदावरी नदीचे दर्शनच भाविकांना होत नाही. ते होण्यासाठी त्यांना खाली उतरून जावे लागते.

सिमेंट काँक्रिटमधील दीपस्तंभ उभे राहतील का?

गोदावरी सौंदर्यीकरणाचे काम सध्या सुरु आहे. साधारणपणे 68 कोटी रुपयांचा खर्चाचा त्यात समावेश आहे. त्याअंतर्गत गोदावरीच्या दोन्ही बाजूला दीपस्तंभ उभारले जात आहेत. याबाबत निघालेल्या निविदेमध्ये बेसाल्ट खडक आवश्यक असे असताना देखील सरळ सरळ सिमेंट काँक्रिटमध्ये ते उभारले जात आहे. पुराचे पाणी जेव्हा होळकर पूल ओलांडते तेव्हा ते रौद्ररूप धारण करते. ज्यावेळी पूर येईल त्यावेळी हे सिमेंट काँक्रिटमध्ये उभे केलेले दीपस्तंभ राहतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रामसेतू पूल नव्याने उभारणार का ?

रामसेतू पूल पाडण्याबाबत स्मार्ट सिटीच्या अहवालात नोंद झाली आहे. आज ना उद्या तो पाडण्यात येणारच आहे. मात्र अद्याप तो पुन्हा नव्याने उभारण्यात येणार का? याबाबत स्मार्ट सिटीने स्पष्ट केलेले नाही. यासाठी संपूर्ण नाशिककर एक दिवस या ठिकाणी ठाण मांडून होते. स्वतः पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जातीने या ठिकाणी उपस्थित राहून या पुलाची डागडुजी करावी.महापूर आल्यानंतर जर रामसेतू पडणार असेल तर आताच त्याची डागडुजी होणे आवश्यक आहे किंवा जुना पाडून नवीन उभारणे आवश्यक आहे.याबाबत स्मार्ट सिटीकडून फक्त पाडण्याबाबत माहिती मिळते आहे. पुन्हा उभारणीबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.

निवड काळ्या पाषाणाची, वापर वेस्ट दगडाचा

सध्या यशवंतराव महाराज पटांगणावर फरशा बसविण्याचे काम सुरु आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात देखील या ठिकाणी फरश्या बसविण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर आलेल्या किरकोळ पुरात या फरश्या वाहून गेल्या. गोदावरीच्या पटांगणात जुन्या काळ्या दगडात असलेले बांधकाम तोडून त्यावर सिमेंटचे सपाटीकरण करणे आणि त्यावर पुन्हा सिमेंटचे ब्लॉक बसविणे असे काम सुरु आहे. जर सगळे चांगले आह, तर मग हे पुन्हा काढून फरशा बसविण्याचा घाट का घालण्यात आला असा प्रश्न निर्माण होत आहे. या फरशा बसविताना पांडवलेणी, चांभारलेणी याठिकाणी असलेल्या काळ्या पाषाणाची निवड करण्यात आली होती मात्र, त्याऐवजी राजस्थान येथील मकराना या ठिकाणी असलेला वेस्ट दगड वापरण्यात आल्याचे समोर येत आहे. या फरशा बसविल्याने आता एकूणच 6 इंच ते 1 फूट एवढी उंची प्राप्त होणार आहे. त्यामुळे महापुरात पाण्याची पातळी वाढणार आहे. 1 इंचाने जरी पुराच्या पाण्याची पातळी वाढली तरी ते पाणी शहरात पोहचते.आता 6 इंच ते 1 फूट म्हणजे पुराचे पाणी कुठे कुठे पोहचेल? असा प्रश्न नागरिक विचारत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या