लघु पाटबंधारे जलाशयातून पाणी सोडू देणार नाही

jalgaon-digital
3 Min Read

अकोले |प्रतिनिधी| Akole

अंबित, बलठण, कोथळे, शिरपंजे, घोटी, देवहंडी या जलाशयाचे पाणी सोडू दिले जाणार नाही असा निर्णय या परिसरातील शेतकर्‍यांनी घेतला असून तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना पठार भागाला पाणी द्यायचे असेल तर स्वतंत्र 200 दशलक्ष घनफूट क्षमतेचे जलसाठा बांधून द्यावे, त्यास आमची हरकत नाही मात्र जाणीवपूर्वक मतांच्या राजकारणासाठी पाणी प्रकल्पाला मंजुरी देऊन गरीब आदिवासी शेतकरी उध्वस्त करण्याचा कुटील डाव हाणून पाडू, असा इशारा बैठकीत देण्यात आला.

यावेळी कोथळा, देवहंडी, बलठण, शिरपुंज, आंबित, पाणलोट क्षेत्रातील सी. बी. भांगरे, श्रावण भांगरे, सुरेश भांगरे, सुरेश हिले, श्रावण हिले, गणपत भांगरे, किसन पोटकुले, अंकुश भांगरे, कमल बांबले, भास्कर बांडे, पंढरी सदगिर, पांडुरंग भांगरे, काशिनाथ बांबळे, रामनाथ भांगरे, किसन पोट कूले, नथु भांगरे, शांताबाई कोंडार, पंढरी सदगीर, भवांन पाटील, निवृत्ती बगनर, मनीषा भांगरे आदी शेतकरी उपस्थित होते.

पिंपळगाव खांड जलाशयातून संगमनेर तालुक्यातील 65 कोटी रुपयांची योजना तयार करून मंजुरी घेण्यात आली आहे. त्यास आमदार डॉ. किरण लहामटे यांनी लेखी पत्र देऊन संमती दिली आहे. त्यामुळे पिंपळगाव खांड जलाशयातून पाणी उपसा झाल्याने येथील शेतकरी पाण्यापासून वंचित राहील व आमच्या भागातील धरणातून पाणी सोडण्यात आल्यावर आमच्या गरीब आदिवासी शेतकर्‍यांना त्याचा त्रास सहन करावा लागेल त्यामुळे आम्ही आमच्या धरणातून पाणी सोडण्यास नकार देत आहे.

यावेळी सी. बी. भांगरे यांनी तालुक्यामध्ये माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी 14 जलाशय बांधली तर 12 बंधारे बांधून मुळा बारमाही करून आदिवासी शेतकर्‍यांना बागायतदार बनवले आहे. पाणी उपलब्ध झाल्यामुळे या भागातील शेतकर्‍यांनी पतसंस्था, जिल्हा सहकारी बँक, राष्ट्रीय कृत बँक व खाजगी सावकाराकडून लाखो रुपयांचे कर्ज काढून पाइपलाइन केल्या शेती दुरुस्ती केली. मात्र तालुक्याचे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी आमच्या हक्काचे पाणी संगमनेर तालुक्याला द्यायला निघाले आहेत.

आमचा त्याला विरोध नाही मात्र आमच्या ताटातील हक्काचे दुसरीकडे देण्याचा त्यांना हक्क नाही द्यायचे असेल तर स्वतंत्र धरण बांधून पाणी द्यावे. 11 गावे 14 वाड्यांना पिंपळगाव खांड धरणातून पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे त्यास कोतूळ परिसरातील दहा गावांनी विरोध केला आहे. आमचाही त्याला विरोध असून पिंपळगाव पाणी सोडून मुळा परिसरातील अंबित, बलठण, धरण रिकामे करण्याचा आमदार डॉ. किरण लहामटे यांचा डाव हाणून पाडू असा इशारा देण्यात आला. तर तसे प्रयत्न झाल्यास आम्हाला तहसील कार्यालयावर जनावरे घेऊन मोर्चा काढावा लागेल असा इशारा चींधू थिगले यांनी दिला याबाबत दोनशे शेतकर्‍यांनी सह्या करून निवेदन तहसीलदारांना दिले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *