Friday, April 26, 2024
Homeनगरसंगमनेरात कत्तलखान्यावर छापा

संगमनेरात कत्तलखान्यावर छापा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

राज्यात गोवंश जनावरांची हत्याबंदी असताना देखील संगमनेर (Sangamner) शहरात मोठ्या प्रमाणावर जनावरांची कत्तल (Slaughter of Animals) होत असल्याचे उघड झाले आहे. गुरुवारी मध्यरात्री संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पोलीस पथकासह जावून शहरातील कत्तलखान्यावर छापा (Slaughterhouse Raid) टाकून सुमारे 1700 किलो गोमांस सह दोन मोठी वाहने जप्त केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

- Advertisement -

दुचाकी व पिकअप वाहनाचा अपघात; एक ठार एक गंभीर जखमी

संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांना गुप्त खबर्‍यामार्फत माहिती मिळाली की, शहरातील मोगलपुरा येथील आयुब तांबोळी यांच्या चाळीमध्ये दोन नंबरच्या खोलीमध्ये सोन्या कुरेशी व त्याचा साथीदार सलीम कुरेशी हे जनावरांची कत्तल करत आहे. या गुप्त माहिती द्वारे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी स्वतः पोलीस पथकातील पोलीस नाईक आण्णासाहेब दातीर, पोलीस कॉन्स्टेबल बोडखे, पोलीस कॉन्स्टेबल आढाव, प्रमोद गाडेकर यांना सोबत घेत सदर ठिकाणी छापा टाकला.

या छाप्यात मोगलपुरा येथील आयुब तांबोळी याचे मालकीच्या चाळीत दोन नंबरच्या खोलीतून तिन इसम गोवंश जनावरांचे मांस बाहेर काढून ते घेऊन जात एका ओमीनी कार मध्ये व एका पिकअप गाडीमध्ये भरत असताना दिसून आले. पोलिसांना बघताच दोघे पळाले तर आसिफ इकबाल कुरेशी (वय 32, रा. मदिनानगर, संगमनेर) व एक अल्पवयीन बालक यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. पिकअप गाडी व ओमनी कार यामध्ये पाठीमागील भागात जनावरांचे कत्तल केलेले गोमांस भरलेले असताना आढळून आले.

पिकअप जीप मध्ये 1200 किलो गोमांस तर खोलीमध्ये शंभर किलो गोमांस तसेच सुझुकी कंपनीची ओमनी कार मध्ये असे 400 किलो गोमांस असे एकूण 1700 किलो गोमांस 3 लाख 40 हजार रुपये किमतीचे पोलिसांनी जप्त केले आहे. त्याचबरोबर महिंद्रा बोलेरो पिकअप जीप एम. एच. 12 एल टी. 4371 व ओमनी कार क्रमांक एम एच 12 एफ. डी. 1446 ही दोन्ही वाहने तसेच जनावरांची कत्तल करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण 9 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आसिफ इकबाल कुरेशी (राहणार मदिना नगर) व अल्पवयीन बालक, सोनू रफिक कुरेशी, सालीम साठम कुरेशी (राहणार संगमनेर) तसेच पिकअप वरील चालक, ओमनी कारवरील चालक यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 306/2023 भारतीय दंड संहिता कलम 429, 269, 34 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे सुधारित 2015 चे कलम 5 (क) 9 (अ) भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या