Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरमाजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांना महिलांकडून मारहाण

माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांना महिलांकडून मारहाण

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील घुलेवाडी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांना दोन महिलांनी घुलेवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शिवीगाळ करत त्यांना मारहाण केल्याची घटना काल सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. जुन्या वादातून ही घटना घडली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

घुलेवाडी येथील कविता सुरेश अभंग व माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत हे शेजारी राहतात. त्यांच्यामध्ये सामुदायिक रस्त्यावरून नेहमीच वाद होत असतो. दि. 13 सप्टेंबर रोजी या दोन कुटुंबांमध्ये वाद झाले होते. त्यावेळी त्यांनी एकमेकांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या. काल सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास राऊत हे तलाठी कार्यालयात कामानिमित्त त्यांच्या कारमधून (क्र. एम एच-17 बी एक्स-0643) गेले होते. या ठिकाणी त्यांचे मित्र भेटल्याने त्यांनी आपले वाहन थांबवले.

मित्रांसोबत चर्चा झाल्यानंतर थोडे पुढे गेले असता कविता संतोष अभंग, विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग, भारत संभाजी भोसले हे त्यांच्या वाहनांमधून आले. राऊत यांच्या गाडीला आडवी गाडी लावली व ते सर्वजण खाली उतरले. कविता संतोष अभंग व विद्या संतोष अभंग या दोघींनी राऊत यांना गाडीतून खाली ओढले. विद्या अभंग हिने खाली पाडून शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी त्याठिकाणी त्यांच्यासोबत असणार्‍या भारत भोसले व प्रथमेश अभंग या दोघांनी त्याच्या मोबाईलमध्ये मारहाणीचे व्हिडिओ शुटिंग केले.

ही मारहाण सुरू असताना थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ तेथे आले. तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभे असलेले राऊत यांचे मित्र राजू आव्हाड, चंद्रकांत वाकचौरे, राजू खरात, रवि गिरी व दीपक अभंग यांनी येऊन राऊत यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी भारत भोसले याने कविता संतोष अभंग व विद्या अभंग या दोघींना राऊत यांना दगड फेकून मारण्यास सांगितले. त्यानुसार दोघींनी दगड फेकून मारले. त्यामध्ये सिताराम राऊत यांना दगड लागल्याने ते जखमी झाले तसेच त्यांच्या कारवर देखील दगड लागल्याने कारचे देखील नुकसान झाले आहे. त्यानंतर तेथे असलेले ज्ञानेश्वर मुटकुळे, प्रताप ओहोळ, लखन राऊत यांनी भांडण सोडविले.

याबाबत सिताराम राऊत यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी कविता अभंग, विद्या अभंग, प्रथमेश अभंग (सर्व रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) व भारत संभाजी भोसले (रा. कोंची, ता. संगमनेर) या चौघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 810/2022 भारतीय दंड संहिता 327, 337, 341, 323, 500, 504, 506, 34 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या