सीना नदी पात्राची हद्द निश्चिततेची मोहीम पुन्हा सुरू

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिका प्रशासनाने बंद पडलेली सीना नदी पात्राची हद्द निश्चितेची मोहीम भूमि अभिलेख विभागाच्या सहकार्याने गुरूवारपासून पुन्हा सुरू केली आहे. नदी पात्रालगत असलेल्या खासगी जागांची मोजणी करून त्यांची व पात्राची हद्द निश्चित केली जाणार असल्याचे व मनपाने नियुक्त केलेल्या खासगी संस्थेमार्फत निश्चित झालेल्या हद्दींची जीपीएसद्वारे विकास आराखड्यावर नोंद घेतली जाणार असल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले.

सीना नदी पात्र व पूर नियंत्रण रेषेचे सर्वेक्षण करत कुकडी पाटबंधारे विभागाने महापालिकेकडे नकाशे सादर केले होते. मात्र, या नकाशाद्वारे हद्द निश्चित करण्याचे काम सुरू असताना अनेक ठिकाणी खासगी जागेत हद्द दर्शवण्यात आली होती. त्यामुळे ही मोहीम ठप्प झाली होती. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी अहवाल मागवल्यावर कुकडी पाटबंधारे विभागाने हद्द निश्चितीबाबत हात झटकले.

भूमि अभिलेख व मनपा प्रशासनाने खासगी जागा मोजून त्यांची हद्द निश्चित करावी व उर्वरित हद्द नदी पात्र म्हणून नोंद करावी, असे मत व्यक्त केले होते. त्यानुसार आता भूमि अभिलेख विभागाचे अधिकारी व मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी संयुक्तपणे हद्द निश्चितीचे काम करत आहेत. नागापूर येथील पुलापासून गुरूवारी हे काम सुरू करण्यात आले. मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख, अर्जुन जाधव, भूमी अभिलेख विभागाचे रवी डीक्रूज, आरोटे कन्सल्टंटचे गणेश भोईटे यांच्यासह नगररचना विभागातील कर्मचारी व अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

नागापूर पुलाखाली खासगी जागा मोजून हद्द निश्चित करण्याचे काम सुरू केले आहे. नदीच्या दोन्ही बाजूला खासगी जागांची हद्द निश्चित केल्यावर नदी पात्राच्या लगत प्रत्येक जागा मोजून खासगी हद्द निश्चित केली जाणार आहे. खासगी जागेची हद्द मोजून उर्वरित हद्द नदीपात्र म्हणून निश्चित होणार आहे. मनपाने नियुक्त केलेल्या खासगी संस्थेकडून जीपीएसद्वारे विकास आराखड्यावर त्याची नोंद घेतली जाणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *